Vinod Patil: शिवरायांची मूर्ती काढायला लावणाऱ्या तिरुपती प्रशासनावर विनोद पाटील संतापले; म्हणाले...
Vinod Patil: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, त्यांनी त्या राज्यातील मुख्यमंत्री यांच्यासोबत बोलले पाहिजे आणि त्यांना सूचना केल्या पाहिजे; विनोद पाटील

Aurangabad News: तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जाणाऱ्या वाहनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्यास प्रवेश दिला जात नसल्याचे काही व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या घटनेचा निषेध करत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तुमच्या वाहनात असेल तर आम्ही तुम्हाला प्रवेश देणार नाही, हे सांगणे आमच्या अस्मितेचा अवमान असल्याचं विनोद पाटील म्हणाले आहे.
या सर्व घटनेवर प्रतिक्रीया देतांना विनोद पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महराजांची प्रेरणा मिळावी या भावनेने अनेक शिवभक्त आपल्या वाहनात शिवरायांची मूर्ती बसवतात आणि तिची पूजा करतात. मात्र काल दुर्दैवी घटना घडली असून,तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जात असतांना काही शिवभक्तांना प्रवेशद्वारावर अडवण्यात आले. तसेच त्यांना सांगण्यात आले की, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तुमच्या वाहनात असेल तर आम्ही तुम्हाला प्रवेश देणार नाही. त्यामुळे तिरुपती बालाजी प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो असे विनोद पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना विनंती...
यावेळी बोलतांना विनोद पाटील म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, त्यांनी त्या राज्यातील मुख्यमंत्री यांच्यासोबत बोलले पाहिजे आणि त्यांना सूचना केल्या पाहिजे. तसेच शिवरायांची मूर्ती काढायला सांगणारे तुम्ही कोण असा जाब त्यांना विचारला पाहिजे. सोबतच बालाजी मंदिराच्या मंडळावर शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर सदस्य असून, त्यांनी तत्काळ तिथल्या प्रशासनाला जाब विचारला पाहिजे, असे विनोद पाटील म्हणाले.
आम्हाला वाद करायचा नाही, पण...
तर पुढे बोलतांना विनोद पाटील म्हणाले की, आम्हाला कोणताही वाद करायचा नाही. हिंदू देवस्थान आमचं देखील आहे. मात्र छत्रपती शिवराय हे आमचे दैवत असून, त्यांना जर आम्ही सोबत नेऊ शकत नसेल तर यापेक्षा दुर्दैवी घटना भारतात असू, शकत नाही. त्यामुळे भारत सरकराने सुद्धा हा विषय तत्काळ मार्गी लावला पाहिजे. अन्यथा आमच्या भावाना कुठल्याप्रकारे आम्ही व्यक्त करू हे आज सांगू शकत नाही, असा इशाराही विनोद पाटील यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
