Cabinet expansion: दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांचे नाव आघाडीवर, औरंगाबादला एकाचवेळी चार मंत्रीपद?
Sanjay Shirsat: पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी शिरसाट यांचे ऐनवेळी नाव डावलण्यात आले होते.
Cabinet expansion: पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून हालचालींना वेग आला असून, हिवाळी अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी शिरसाट यांचे ऐनवेळी नाव डावलण्यात आले होते. त्यामुळे यावेळी त्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची दाट शक्यता आहे. ज्यात आमदार संजय शिरसाट, भारत गोगावले, बच्चू कडू, योगेश कदम, प्रकाश अबिटकर, सदा सरवणकर आणि बालाजी किणीकर यांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यात शिरसाट यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उशिरा का होईना पण शिरसाट यांना अखेर मंत्रीमंडळात संधी मिळणार आहे. आता त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार की, राज्यमंत्री पद मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
शिरसाट नाराज असल्याची चर्चा...
पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारत अचानक ऐनवेळी शिरसाट यांना डावलण्यात आल्याने शिरसाट नाराज असल्याची अनेकदा चर्चा झाली. तर काहीवेळा शिरसाट यांनी देखील सार्वजनिक कार्यक्रमात आपली इच्छा बोलावून दाखवली. त्यामुळे यावेळी मंत्रीमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरसाट यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तर पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्यावेळी दुसऱ्या टप्प्यात आपला नंबर लागणारच अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली होती.
औरंगाबादला एकाचवेळी चार मंत्रीपद
यापूर्वी तीन आणि आता शिरसाट यांच्या रूपाने औरंगाबाद जिल्ह्याला एकाचवेळी चौथा मंत्री मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी पैठणचे आमदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याकडे रोजगार हमी योजना मंत्रिपदाची तर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडे कृषिमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच औरंगाबाद पूर्वचे अतुल सावे (Atul Save) यांच्याकडे सहकार मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शिरसाट यांच्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याला एकाचवेळी चार मंत्रीपद मिळण्याची पहिलीच वेळ असणार आहे. विशेष म्हणजे भागवत कराड आणि रावसाहेब दानवे हे केंद्रीय राज्यमंत्री देखील औरंगाबादचेच आहे.
Aurangabad: जिल्ह्यात मंत्री झाले फार, त्यामुळे मिळेना सरकारी कार; प्रशासनाचे होतायत हाल