मोठी बातमी! औरंगाबादेत 'हर हर महादेव'वरून मनसे-संभाजी ब्रिगेडमध्ये राडा
Aurangabad News: चित्रपटगृहाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Aurangabad News: 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली असून, चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याच्या आरोपामुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडण्यात येत आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये 'हर हर महादेव'वरून मनसे-संभाजी ब्रिगेडमध्ये राडा पाहायला मिळत आहे. 'हर हर महादेव' चित्रपट पुन्हा सुरु करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली असून, संभाजी ब्रिगेडने याला विरोध केला आहे.
औरंगाबादच्या फेम तापडिया चित्रपटगृहात मनसे आणि संभाजी ब्रिगेड काही वेळापूर्वी आमने-सामने आले होते. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरु होती. तर चित्रपट सुरु करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली तर, संभाजी ब्रिगेडने याला विरोध करत शो बंद करण्याची मागणी केली. त्यामुळे काही वेळेसाठी तणावाचे वातावरण याठिकाणी पाहायला मिळाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटाने वेगळे करत, ताब्यात घेतले आहे. मात्र चित्रपटगृहाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शो बंद करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: मनसे
या सर्व राड्यावर बोलतांना मनसेची (MNS) नेते आशिष सूरवडकर म्हणाले की, शहरातील फेम तापडिया चित्रपटगृहात काल हर हर महादेव चित्रपट सुरु असतांना शो बंद करण्यात आल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. त्यामुळे आज सकाळी आम्ही येथे आलो आणि चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना याबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांनी 1 वाजता शो सुरु करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार हर हर महादेव चित्रपट सुरु असून, आता त्याचा शेवट होईपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत. तर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना कोणेही जुमानत नसून, त्यांचा शो बंद करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला असल्याचा दावा मनसेकडून यावेळी करण्यात आला.
शो चालू देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा इशारा...
तर यावर बोलतांना मराठा संघटनेचच्या कार्यकर्त्यांनी म्हंटले आहे की, फेम तापडिया चित्रपटगृहात सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद करण्याची आम्ही मागणी केली आहे. त्यानुसार चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी शो बंद केला आहे. तर यापुढे या चित्रपटाचा कोणताही शो दाखवू नयेत अशी त्यांना समज दिली असून, त्यांनी मान्य केली असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि संभाजी ब्रिगेड यांनी म्हंटले आहे. तसेच यापुढे जर हर हर महादेव या चित्रपटाचा शो लावला तर होणाऱ्या अनर्थाला प्रशासन आणि चित्रपटगृहाचे व्यवस्थापक जबाबदार असतील असा इशारा देखील यावेळी संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला.
Aurangabad: संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक भुमिकेनंतर औरंगाबादेतील 'हर हर महादेव' चित्रपटाचे शो बंद