(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक भुमिकेनंतर औरंगाबादेतील 'हर हर महादेव' चित्रपटाचे शो बंद
Aurangabad: औरंगाबाद शहरात देखील दोन चित्रपटगृहांतील शो संभाजी ब्रिगेडच्या मागणीनंतर तत्काळ बंद करण्यात आले आहेत.
Aurangabad News: 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली असून, चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याच्या आरोपामुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तर राजकीय पक्षांसह अनेक संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. तर संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade ) आक्रमक भूमिका घेतल्याने अनेक ठिकाणी शो बंद करण्यात आले आहे. दरम्यान औरंगाबाद शहरात देखील दोन चित्रपटगृहांतील शो संभाजी ब्रिगेडच्या मागणीनंतर तत्काळ बंद करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजी राजे यांनी 'हर हर महादेव' या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी संभाजीराजेंच्या भूमिकेला पाठींबा दिला आहे. तर राष्ट्रवादीसह संभाजी ब्रिगेडही आक्रमक झाली आहे. संभाजी ब्रिगेडच्या मागणीनंतर औरंगाबाद शहरातील आयनॉक्स तसेच खिवंसरा मल्टिप्लेक्स चित्रपटगृहातील 'हर हर महादेव' चित्रपटाचे शो बंद करण्यात आले आहेत. आयनॉक्स येथे तीन, तर खिवंसरा येथे एक शो दाखवण्यात येत होता, संभाजी ब्रिगेडच्या शो बंद करण्याच्या मागणीनंतर या दोन्ही चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट दाखवण्यात येणार नाही, दरम्यान चित्रपट पाहण्यासाठी झालेल्या बुकिंगचे पैसेही प्रेक्षकांना परत देण्यात आले असल्याचे चित्रपटगृह व्यवस्थापकांनी सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोड म्हणाले की, शहरातील आयनॉक्स तसेच खिवंसरा मल्टिप्लेक्स या चित्रपटगृहात हर हर महादेव या चित्रपटाचे शो सुरू होते, आम्ही त्यांच्या व्यवस्थापनाकडे शो बंद करण्याची मागणी केल्यानंतर पुढील शो त्यांनी तत्काळ रद्द केले आहे. त्यामुळे हर हर महादेव या चित्रपटावरून सुरु असलेल्या वादाचे पडसाद आता औरंगाबादमध्ये देखील उमटताना पाहायला मिळत आहे.
पोलिसांकडून खबरदारी...
हर हर महादेव या चित्रपटावरून सुरु असलेल्या वादाचे पडसाद आता औरंगाबादमध्ये देखील पाहायल मिळत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जात असून, यावर शहर पोलीस लक्ष ठेवून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेकडून या चित्रपटाला पाठींबा मिळत असताना, काही मराठा संघटनांनी मात्र याला विरोध केला आहे. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून पोलीस लक्ष ठेवून आहे. तर आज मनसेकडून (MNS) चित्रपट सुरु करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे.