Aaditya Thackeray: महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवा आहे; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा
Aaditya Thackeray: सर्वसामान्यप्रमाणे उद्योजकांनाही आता या सरकारवर विश्वास राहिला नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
Aaditya Thackeray: फॉक्सकॉननंतर सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प (C 295 transport aircraft) महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. सर्वसामान्यप्रमाणे उद्योजकांनाही आता या सरकारवर विश्वास राहिला नसून, महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवा असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, चौथा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला आहे.या घटनाबाह्य सरकारमधील एक इंजन फेल झालं आहे. तर जनतेप्रमाणे उद्योजकांनाही या सरकारवर विश्वास राहिला नाही. महिनाभरापूर्वी सांगितलेला प्रकल्प महाराष्ट्रात येणार म्हणाले असताना, मग तो गेला कसा? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तर एमआयडीसीत येणाऱ्या अनेक प्रकल्पांकडे लक्ष दिले जात नाही. महाराष्ट्र शिंदे सरकारला माफ करणार नसून, या महाराष्ट्राला उद्योगमंत्री उदय सामंत यांचा राजीनामा हवा असल्याचं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
कृषिमंत्र्यांवर टीका...
याचवेळी बोलतांना आदित्य ठाकरे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरची मदत करण्यात यावी अशी मागणी करतांना, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आदित्य यांनी केली. सरकारचे मंत्री बांधावर जायला तयार नाहीत. तर आम्ही पाहणीसाठी गेलो असता लोकांना कृषिमंत्री यांचे नाव देखील माहित नाही, त्यांना कोणी पहिले नसल्याचे शेतकरी म्हणाले. त्यामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार राजीनामा देणार का?,एवढी मोठी परिस्थिती असताना देखील कृषीमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यासोबत वेगळा कार्यक्रम करण्यासाठी बसायचं होतं, असा टोला आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला.
मंत्री बांधावर जायला तयार नाही...
राज्यात शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान झाले आहे. पावसाळी अधिवेशनात देखील आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती, पण या सरकराने लक्ष दिले नाही. त्यात आता परतीच्या पावसाने पुन्हा मोठ्याप्रमाणावर नुकसान केले असून, अक्षरशः अजूनही शेतांमध्ये पाणी तुंबलेले आहे. त्यामुळे परिस्थिती भयानक आहे. म्हणून ओला दुष्काळ करण्याची आमची मागणी आहे. सरकारमधील मंत्री बांधावर जायला तयार नसून, शेतकऱ्यांच्या व्यथा ते जाणून घेत नाही. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या असून, आज बळीराजाला धीर देण्याची गरज आहे. मात्र असे असताना शेतकऱ्यांच्या नुकसानीची या घटनाबाह्य सरकराने कोणतेही दखल घेतली नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
आमदार कैलास पाटीलांना भेटायला जाणार...
उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील जिल्ह्यातील पीक विम्यासह विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान अंबादास दानवे आणि मी लवकरच कैलास पाटलांच्या भेटीला जाणार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तर आम्ही त्यांना लढा मोठा आहे सांगितलं आहे, पण त्यांनी लढा सुरु केला असल्याचं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.