Video: गलिच्छ विधान केल्यानंतर पहिल्यांदा दौऱ्यावर आलेल्या अब्दुल सत्तारांवर फुलांची उधळण
Aurangabad : अब्दुल सत्तार यांचे अशाप्रकारे स्वागत करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Aurangabad News: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ विधान करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबद्दल राज्यभरात सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे खुद्द शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांच्या विधानाला चुकीचं ठरवलं आहे. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील सत्तार यांच्या विधानाचे समर्थन करता येणार नसल्याचे म्हंटले आहे. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर आज पहिल्यांदाच औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करून स्वागत केले आहे. सत्तार यांचे अशाप्रकारे स्वागत करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिंदे गटावर 'पन्नास खोके'बद्दल होणाऱ्या आरोपांवरून टीका करतांना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर आणि शिंदे सरकारवर मोठ्याप्रमाणावर टीका झाली. तर सत्तार यांच्या घरावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला देखील केला. त्यानंतर सत्तार यांनी माफी देखील मागितली. पण अजूनही विरोधकांकडून राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे. अशात अब्दुल सत्तार यांनी आज औरंगाबादचा दौरा केला. यावेळी सत्तार हे औरंगाबादच्या विश्रामगृहात आले असतांना कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत केले. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या सत्तार यांच्या अंगावर टाकण्यात आल्या. एखांदा विजय मिळवल्यासारखा सत्तारांचे करण्यात आलेल्या या स्वागतामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पहा सत्तारांच्या स्वागताचा व्हिडिओ...
Video: गलिच्छ विधान केल्यानंतर पहिल्यांदा दौऱ्यावर निघालेल्या सत्तारांवर फुलांची उधळण@MosinAbp pic.twitter.com/Cpkjd1OPMK
— ABP माझा (@abpmajhatv) November 10, 2022
यामुळे लम्पी वाढला...
औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर लम्पी बाधित जनावरे असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, मुळात लम्पी हा आजार वाढण्याचे कारण म्हणजे औरंगाबाद जिल्हा जळगावला केठून आहे. तर राजस्थान आणि मध्यप्रदेशमधून जळगावात लम्पी मोठ्याप्रमाणावर आला. त्यामुळे दोन्ही जिल्हे आजूबाजूला असल्याने लम्पीचा प्रादुर्भाव औरंगाबाद जिल्ह्यात वाढला असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. तर यावर आमच्या अधिकाऱ्यांनी नियंत्रण मिळवले असल्याचे देखील सत्तार म्हणाले. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्यावेळी पत्रकारांशी संवाद साधतान ते बोलत होते.
पहिल्यांदाच तीन वेळा मदत दिली जातेय...
राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईबाबत बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, गेल्या पंचवीस वर्षांचा तुम्ही इतिहास पहा एकाच हंगामात तीन वेळा कधीच सरकारने मदत केली नाही. मात्र आमच्या सरकारकडून तीन वेळा मदत केली जात आहे. सुरवातीला जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठ फटका बसला. त्यानंतर देखील पुढे पाऊस झाला आणि परतीच्या पावसाने देखील मोठं नुकसान झाले. तीनही नुकसान एकाचवेळी देण्याची ही पहिली वेळ असल्याचं सत्तार म्हणाले. ऑगस्टमध्ये नुकसान होते आणि सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची मदत जमा करून त्यांची दिवाळी गोड करण्याचे काम आमच्या सरकराने केले असल्याचं सत्तार म्हणाले.