Aurangabad: भाऊ, दादांना महानगरपालिकेचा दणका, तीन हजारपेक्षा अधिक अनधिकृत बॅनर्स काढले
Aurangabad: 14 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत शहरातील अनधिकृत बॅनर्स विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
Aurangabad News: फेब्रुवारी 2023 मध्ये औरंगाबाद शहरात G-20 परिषदेसंदर्भात विविध देशांचे शिष्ट मंडळ शहराला भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाकडून 'क्लीन औरंगाबाद' मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान 14 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत शहरातील अनधिकृत बॅनर्स विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत औरंगाबाद शहरातील तब्बल 3 हजार 827 अनधिकृत बॅनर्स काढण्यात आले आहे.
औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी 'क्लीन औरंगाबाद' उपक्रमाअंतर्गत शहरात स्वच्छत मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे शहरात लावण्यात आलेल्या आलेल्या अनधिकृत बॅनर्स, फलक, झेंडे इत्यादी काढण्याचे आदेश चौधरी यांनी दिले आहे. 14 नोव्हेंबरपासून या मोहिमेची सुरवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी शहरातील एकूण 22,00 अनधिकृत बॅनर्स, फ्लेक्स आणि झेंडे काढण्यात आले होते. तर मंगळवारी पुन्हा एकदा 1627 अनधिकृत बॅनर्स, फ्लेक्स आणि झेंडे काढण्यात आले. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत शहरातील तब्बल 3 हजार 827 अनधिकृत बॅनर्स काढण्यात आले आहे. तर आयुक्तांच्या आदेशानुसार अनधिकृतपणे बॅनर्स, फ्लेक्स इत्यादी लावणाऱ्यांकडून दंड आकारण्यात आणि गुन्हा दाखल करण्यात येईल असे नोडल अधिकारी रवींद्र निकम म्हणाले आहे.
असं असणार पथक...
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा मोहिमेचे नोडल अधिकारी रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पडनिर्देशित अधिकारी सविता सोनोवणे, अजय भोये, अतिक्रमण विभागातील सर्व इमारत निरीक्षक, कर्मचारी तसेच सर्व 09 झोनचे सहाय्यक आयुक्त तथा वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त स्वछता निरीक्षक, जवान आणि सफाई मजूर तसेच अतिक्रमण पोलीस पथकाचे पोलीस निरीक्षक हाश्मी आणि त्यांचे पथकातील कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात येत आहे.
आयुक्तांची राजकीय नेत्यांसोबत चर्चा...
फेब्रुवारी 2023 मध्ये औरंगाबाद शहरात G-20 परिषदेसंदर्भात विविध देशांचे शिष्ट मंडळ शहराला भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाकडून 'क्लीन औरंगाबाद' मोहीम हाती घेण्यात आले आहे. मात्र शहरातील अनधिकृत बॅनर्स काढतांना यातील राजकीय नेत्यांचे बॅनर्स मोठ्याप्रमाणावर असल्याचे समोर आले. त्यामुळे महानगरपालिकेच्या या मोहिमेत सहकार्य करण्याच्या उद्दिष्टाने मनपा आयुक्तांनी आज राजकीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. कारण 14 18 नोव्हेंबरपर्यंत बॅनर्स हटवा मोहीम हाती घेण्यात येणार असून, 19 नोव्हेंबरनंतर मात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचा विरोध होऊ नयेत तसेच मोहीम यशस्वी करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी आज दुपारी ही बैठक बोलावली असल्याचे बोलले जात आहे.