(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: कृषिमंत्र्यांचा दौरा संपताच पंचनामे करणारं पथक 'नॉट रिचेबल'; आता दिवाळीनंतरच पंचनामे होणार
Aurangabad : अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री पाहणी दौरा केल्यानंतर रविवारी महसूल व कृषी विभागाची पथके गायब झाल्याचे पाहावयास मिळाले.
Aurangabad News: औरंगाबादसह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा परीस्थीतीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नुकसानग्रस्त भागात पाहणी करून, वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश देत आहे. मात्र असे असताना देखील औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यात काही सरकारी बाबूंचा कामचुकारपणा पाहायला मिळाला आहे. कारण अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री पाहणी दौरा केल्यानंतर रविवारी महसूल व कृषी विभागाची पथके गायब झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे आता दिवाळीनंतरच पंचनामे होणार असल्याचे बोलले जात आहे.
अब्दुल सत्तार यांचे मतदारसंघ असलेल्या सिल्लोड-सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री 8 वाजता पाहणी केली. जवळपास रात्री 10 वाजेपर्यंत कृषिमंत्र्यांनी बनोटी ते फर्दापूर या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र कृषिमंत्र्यांचा शनिवारचा दौरा आटोपताच रविवारी मात्र एकही अधिकारी किंवा कर्मचारी पंचनाम्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे आता पंचनामे करणारे पथक कधी परतणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अधिकाऱ्यांचे मोबाइल नॉट रिचेबल...
शनिवारी कृषिमंत्री स्वतः पाहणीसाठी आल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी हजर झाली. यावेळी लवकरात-लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे निर्देश कृषीमंत्री यांनी दिले. पण दुसऱ्या दिवशी या अधिकाऱ्यांचे मोबाइल नॉट रिचेबल होते. त्यामुळे आता दिवाळी नंतरच नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान शेतकऱ्यांच्या अडचणीत तरी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी केली जात आहे.
पंचनामेचं नाही तर मदत कधी मिळणार...
मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी देखील गोड होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी पंचनामे झाल्यावर 15 दिवसांत खात्यावर पैसे जमा करण्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली होती. मात्र आता पंचनामे होण्यासाठीच वेळ होत असल्याने नुकसानभरपाई कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठवाड्यात परतीच्या पावसाने 20 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे आणखी एक आठवडा पंचनामे करण्यासाठी लागण्याची शक्यता आहे.
Aurangabad: उद्धव ठाकरेंचा दौरा अन् विरोधकांची टीका सुरु असतानाचं औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या