Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
Beed News: वाल्मिक कराडला कोणी पोसले, तो कोणाच्या पाठबळामुळे मोठा झाला, तो कोणाचा जवळचा माणूस आहे, असा सवाल प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, या मागणीने जोर धरला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिरात (NCP Shirdi Shibir) धनंजय मुंडे यांनी दंड थोपटत विरोधकांना थेट इशारा दिला होता. अजित पवार (Ajit Pawar) यांनीही धनंजय मुंडे यांची बाजू उचलून धरत एकप्रकारे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्बवत नाही, असे संकेत दिले होते. परंतु, धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरुन अजित पवार गटामध्येच मोठी खदखद असल्याचे रविवारी समोर आले.
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उघडपणे धनंजय मुंडे यांना अजितदादांनी दिलेल्या राजकीय अभयाबाबत नाराजी व्यक्त केली. धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले नाही, ही चांगली गोष्ट झाली. संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे बीड जिल्ह्याची बदनामी होत आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे, वाळू उपसा, राखेची अवैध वाहतूक, मटका या माध्यमातून होणारी प्रचंड आर्थिक उलाढाल चर्चेचा विषय ठरत आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असताना हे सगळे प्रकार घडले. हीच बाब आम्ही अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊ नका, अशी विनंती आम्ही अजितदादांना केली होती. त्यांच्या मंत्रिपदाबाबतही विचार करावा, असे आम्ही सुचवले होते. परंतु, बीड जिल्ह्यातील जी परिस्थिती आम्हाला दिसते ती आमच्या पक्षनेतृत्त्वाला दिसत नाही, अशी खंत प्रकाश सोळंके यांनी उघडपणे बोलून दाखवली.
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळेच मोठा झाला: प्रकाश सोळंके
धनंजय मुंडे यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या शिबिरात वाल्मिक कराड याच्यासोबत आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा फेटाळून लावला होता. या सर्व बातम्या खोट्या असल्याचे मुंडे यांनी म्हटले होते. मात्र, प्रकाश सोळंके यांनी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्यामुळेच मोठा झाल्याचे म्हटले. धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने बीडचे पालकमंत्रिपद असल्यानेच जिल्ह्याची वाट लागली. वाल्मिकला कोणी पोसले? तो कोणाचा माणूस आहे? धनंजय मुंडे यांच्यामुळे तो मोठा झाला, असे प्रकाश सोळंके यांनी म्हटले.
मी अभिमन्यू नाही, अर्जुन आहे: धनंजय मुंडे
धनंजय मुंडे यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटत सुरेश धस यांच्यासह विरोधकांना इशारा दिला होता. मला कोणी कितीही बिनबुडाचे आरोप करुन अडकवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्यामध्ये यश येणार नाही. कारण मी अभिमन्यू नाही, तर मी अर्जुन आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते.
आणखी वाचा