Aurangabad: उद्धव ठाकरेंचा दौरा अन् विरोधकांची टीका सुरु असतानाचं औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
Aurangabad: आर्थिक संकटात सापडलेल्या पंडित यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले.
Aurangabad News: मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची एकीकडे चर्चा सुरु असतानाच, दुसरीकडे त्याचवेळी एका शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पंडित एकनाथ निकम (वय 47) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. सतत पडत असलेल्या पावसाने पिके मातीमोल झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या पंडित यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले.
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून काल दिवसभर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु होते. याचवेळी कन्नड तालुक्यातील नादरपूर पंडित निकम या शेतकऱ्याने आत्महत्या केली. पंडित निकम यांची नादरपूर शिवारात गट नंबर 121 मध्ये शेती आहे. शेतात उधारीवर बियाणे आणून मका आणि कापूस पिकाची लागवड केली होती. जून-जुलै महिन्यात पाऊस चांगला झाल्याने पिके जोमात होती. कापसाला चांगला भाव मिळेल व कर्ज आणि उधारी फिटेल या आशेवर पंडित निकम यांनी जोमाने पिकांची मशागत व मेहनत केली. मात्र शेवटी परतीच्या अतिपावसाने पिकांना मोठा फटका बसला. कापूस पाण्याखाली तर मकाला कोंब फुटली.
...आणि निकम यांनी टोकाचे पाऊल उचलले...
शेतात प्रचंड झालेल्या नुकसानीनंतर आपल्याकडे असलेली कर्जे तसेच उसनवारी फेडणार कशी या विवंचनेत पंडित निकम होते. तर गेल्या काही दिवसांपासून ते सतत याच विचारत असायचे. दरम्यान रविवारी शेतात कामासाठी जातो म्हणून ते निघून गेले. मात्र तिकडेच लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांनी मृत्यूला कवटाळले. सायंकाळी डोंगरातून बकऱ्या चारून घरी परतणाऱ्या गुराख्यास निकम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी तातडीने गावात माहिती दिल्यानंतर नातेवाईक, गावकरी घटनास्थळी धावले.
परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला
निकम यांना गावकऱ्यांच्या मदतीने तातडीने पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. मयत पंडित निकम यांच्या पश्चात आई, वडील, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. अतिवृष्टीने ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला परिवाराचा आधारवड हिरावून घेतल्याने निकम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर गावात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेत्यांचे दौरे आणि घोषणाबाजी...
राज्यातील शेतकरी आज संकटात सापडला असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून फक्त दौऱ्यावर दौरे केले जात आहे. कृषीमंत्री यांनी आत्तापर्यंत 70 तालुक्यातील गावातील पाहणी केली आहे.मात्र असे असताना देखील शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाईची मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे.