Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी सैफच्या घरात चोरी करण्यासाठी का घुसला? हल्लेखोरानं यासंदर्भात अनेक कारणं सांगितल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्या घरात घुसून हल्ला करण्यात आला. हल्लेखोरानं सैफच्या पाठीत चाकू भोसकला आणि हातावर मानेवर वार केले. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रियाही करावी लागली. अशातच आता सैफला चाकूनं भोसकणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बांगलादेशी आहे.
आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात दाखल केलं. न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणाशी संबंधित आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीनं चौकशीदरम्यान अनेक गुपितं उघड केली आहेत.
आरोपीनं चौकशीत काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर आरोपीनं चौकशीमध्ये सांगितलं की, तो बारावी पास आहे आणि चांगल्या नोकरीच्या शोधात तो मुंबईत आला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सध्या बेरोजगार होता आणि त्याला बांगलादेशात परत जायचं होतं, ज्यासाठी त्याला 50 हजार रुपयांची गरज होती. त्यामुळेच त्यानं चोरी करण्याचा निर्णय घेतला.
सैफ-करिनाचंच घर निशाण्यावर का?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानं सैफ अली खानचंच घर निवडलं कारण, त्यानं पाहिलं होतं की, त्या इमारतीच्या सर्व गेटवर सुरक्षारक्षक नाहीत आणि आतमध्ये जाणंही सोपं होतं. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, गुन्हा केल्यानंतर, आरोपी गीतांजली एक्सप्रेसनं कोलकाताला पळून जाण्याचा आणि नंतर तिथून बांगलादेशला पळून जाण्याचा विचार करत होता. तो आपला डाव अंमलात आणण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून ताब्यात घेतलं होतं.
प्रकरण नेमकं काय?
सैफ अली खानची स्टाफ नर्स एलियामा यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या एफआयआरनुसार, तिनं हल्लेखोराला बाथरूममधून बाहेर येताना पाहिलं. हल्लेखोरानं नर्सला गप्प राहण्याची धमकी दिली आणि 1 कोटी रुपयांची मागणीही केली. एफआयआरच्या प्रतीनुसार, हल्लेखोर यावेळी करीना-सैफचा धाकटा मुलगा जेह याच्याकडेही गेला, त्यानंतर एलियामानं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. जेहला वाचवण्याचा प्रयत्न करताना एलियामा जखमी झाली. तिनं आरडाओरडा केला. आवाज ऐकून सैफ अली खान जेहच्या खोलीत पोहोचला. जेव्हा तो हल्लेखोराचा सामना करू लागला तेव्हा त्याने त्याच्यावर 6 वार केले, ज्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. यानंतर हल्लेखोर तिथून पळून गेला. सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जिथे तो आता बरा होत आहे. दरम्यान, घटनेच्या 72 तासांच्या आत पोलिसांनी त्याला अटक केली.
पाहा व्हिडीओ : Saif Ali Khan Case | सैफ अली खानचा हल्लेखोर कसा अडकला जाळ्यात? ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Saif Ali Khan : कबुल है! सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने गुन्हा कबुल केला, कारणही सांगितलं