Cidco : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ?
Cidco : सिडकोच्या 26 हजार घरांच्या विक्रीसाठीच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेसाठी नोंदणी करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवी मुंबई : सिडकोकडून नवी मुंबईत एकूण 67 हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात त्यापैकी 26000 हजार घरांच्या विक्रीसाठी 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेद्वारे ऑक्टोबर महिन्यापासून नोंदणी सुरु आहे. आता चौथ्यांदा नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता सिडकोच्या नवी मुंबईतील घरांसाठी नोंदणी 25 जानेवारीपर्यंत करता येईल. तर, प्राधान्यक्रम नोंदवण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी करण्यात आली आहे. तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर 55 हजार अर्जदारांनी नोंदणी शुल्क जमा केलं होतं.
अखेरची मुदतवाढ
सिडकोतर्फे ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबईच्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी 26 हजार घरांच्या विक्रीसाठी योजना आणली होती. त्या योजनेला यापूर्वी तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होता. आता शेवटची मुदतवाढ देण्यात आली असून 25 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येतील. तर, 15 घरांची निवड करुन प्राधान्यक्रम नोंदवण्याची अखेरची तारीख 26 जानेवारी आहे. अर्जदारांना नोंदणी शुल्क भरल्यानंतर प्राधान्यक्रम नोंदवावा लागेल. त्यानंतर बुकिंग शुल्क भरावं लागेल.
घरांच्या किमती कमी करण्यास सिडकोचा नकार
सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेतून 26 हजारे घरांची विक्री केली जाणार आहे. सिडकोनं किमती जाहीर करताच अर्जदारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष संजय शिरसाट यांनी किमती कमी करण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यानंतर काही दिवसातच मंत्री पदावर कार्यरत असल्यानं त्यांचा सिडकोचा कार्यभार संपुष्टात आणला गेला. मात्र, सिडकोने जाहीर केलेले दर कमी करणार नसल्याचे सिडको सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी दिलेत. यामुळे सिडकोच्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाल्याचं पाहायला मिळाल. तर, सिडकोने घरांच्या किमती रेडीरेकनर नुसार ठरवल्या असून सिडको अत्याधुनिक सुविधा देत असल्याने घरांच्या किंमती योग्य असल्याचे स्पष्टीकरण सिडकोने दिले आहे.
माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेच्या नोंदणीचे टप्पे
1. नोंदणीसाठी संकेतस्थळाला भेट द्या, तुमचे पूर्ण नाव आणि मोबईल क्रमांक नोंदवा. यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी नोंदवून लॉगीन करा.
2. आधार क्रमांक नोंदवून, आधार ओटीपी पडताळणी करा, पॅन कार्ड क्रमांक नोंदवा.
3. गट निवडा आणि सह-अर्जदाराचे तपशील भरा (लागू असल्यास) आणि सर्व स्वसाक्षांकित कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्र अपलोड करा.
4.एकवेळ भरावयाचे विनापरतावा नोंदणी शुल्क ₹236/- (GST सह) भरा व अर्ज जमा करा.
5. प्राधान्यक्रम नोंदवा, त्यानंतर बुकिंग शुल्क भरा.
इतर बातम्या :