Aurangabad Crime News: चहा विक्रेत्याची हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या
Aurnagbad Crime News: अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढले.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या हर्सूल तलावात (Harsul dam) चहाचे हॉटेल चालविणाऱ्या तरुणाने उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) अथक परिश्रमानंतर या तरुणाला पाण्याच्या बाहेर काढण्यास यश आले. अशोक सुखदेव साळवे (36,रा. एन-7, सिडको) असे मृत हॉटेल चालकाचे नाव आहे. तर पिसादेवी रोडवर साळवे यांचे चहाचे हॉटेल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे जेवणाचा डबा (Lunch Box) घेऊन अशोक साळवे घरातून हॉटेलकडे निघाले. त्यांना रस्त्यात एक मित्र भेटला. त्याच्यासोबत ते हर्सूल तलावावर गेले. दरम्यान मित्राला दुचाकी स्टँडवर उभी करेपर्यंत अशोक साळवे यांनी तलावात उडी घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांचा मित्र देखील गोंधळला. काय करावे त्याल काहीच सुचत नव्हते. त्यामुळे आरडाओरडा करत त्याने आजूबाजूला असलेल्या लोकांना आवाज दिला. त्यानंतर उपस्थितांनी साळवे यांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते खोल पाण्यात आणि गाळात गेल्यामुळे बाहेर काढता आले नाही.
हर्सूल तलावात सद्या मोठ्याप्रमाणावर पाणी असल्याने साळवे यांना काढणं उपस्थितांना जमलं नाही. त्यामुळे याबाबत अग्निशमन विभागाला माहिती कळविली गेली. घटनास्थळी आलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर अशोक यांना पाण्याबाहेर काढले. तेथून त्यांना घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर अशोक यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, असा परिवार आहे. अशोक यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
Aurangabad: हाताला काम मिळेना, त्यात दारूचे वांदे; जीव देण्यासाठी तरुण थेट पोहचला रुळावर
65 वर्षीय 'बाबां'ची आत्महत्या...
दुसऱ्या एका घटनेत खुलताबाद येथून जवळ असलेल्या नंद्राबाद येथे एका 65 वर्षीय व्यक्तीने रात्री साडेसात वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. दत्तू भाऊराव बोडखे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दत्तू बोडखे यांनी राहत्या घरी दरवाजा बंद करून ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. कुटुंबीयांनी आवाज देऊनही घरातून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दत्तू बोडखे यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दत्तू बोडखे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.