'माझे शब्द मागे घेतो..!'; वंचितच्या आक्रमक भुमिकेनंतर चंद्रकात खैरे एक पाऊल मागे
माझा राग भाजप-एमआयएमवर असून, प्रकाश आंबेडकर यांच्यावर नसल्याच चंद्रकांत खैरे म्हणाले.
Chandrakant Khaire Vs Vanchit Bahujan Aghadi: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पैसे घेतल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यांनतर वंचित बहुजन आघाडीकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. खैरे यांनी माफी मागावी अन्यथा काळे फासण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला होता. त्यांनतर आता खैरे यांनी एक पाऊल मागे घेत प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं विधान आपण परत घेत असल्याचं म्हटल आहे.
वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांनी पत्रकार परिषद घेत, चंद्रकांत खैरे यांना आम्ही दोन दिवसांचा वेळ दिला आहे. ज्याप्रमाणे खैरेंनी जालन्यात पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीवर आरोप केले आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद शहरात कुठेही पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर माफी मागावी असा इशारा बकले यांनी दिला होता. दोन दिवसात खैरे यांनी माफी मागितली नाही तर, खैरे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासणार असेही बकले म्हणाले होते. त्यांनतर आता खैरे यांनी आपण प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं विधान आपण परत घेत असल्याचं म्हटल आहे. त्यांनी पैसे घेतले नाही तर मी पण माझे शब्द माघे घेतो,असेही खैरे म्हणाले आहे.
माझा राग भाजप-एमआयएमवर...
प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेला आरोप खैरे यांनी मागे घेतला असला तरी, एमआयएमवर केलेल्या आरोपावर आपण ठाम असल्याचं खैरे म्हणाले आहे. माझा राग एमआयएम आणि भाजपवर असल्याच खैरे म्हणाले. वंचितबाबत आपला राग नाही. प्रकाश महाविकास आघाडीत येऊ इच्छीता, त्यामुळे त्यांच्यावर माझा राग नाही, असे खैरे म्हणाले.
काय म्हणाले होते खैरे...
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. तुम्ही किती कमवले, कुठून आले एवढे पैसे तुमच्याकडे. लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला भाजपने दिले होते. उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करतात, आले कुठून हे पैसे असा आरोप खैरे यांनी यावेळी केला आहे.