जळगावात कोरोनापाठोपाठ सारी आजारानेही रुग्णांचा मृत्यू, प्रशासनासह जनतेची चिंता वाढली
जळगावात कोरोनामुळे अनेक जण प्राण गमावत असतानाच सारी आजारानेही रुग्ण दगावत असल्याचं चित्र आहे. मागील वर्षापासून आतापर्यंत कोरोना महामारीत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या 25 ते 30 टक्के मृत्यू हे सारी आजाराने झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
जळगाव : जळगाव जिल्ह्यात एकीकडे कोरोनामुळे अनेक जण दगावत असताना दुसरीकडे कोरोनासदृश्य असलेल्या सारी आजाराने ही मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनी दिलेल्या माहितीने प्रशासनासह सर्व सामान्य जनतेच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोना महामारीत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या 25 ते 30 टक्के मृत्यू हे सारी आजाराने झाल्याचे मानले जाते.
सध्या संपूर्ण देशभर कोरोनाचा प्रसार वाढला असल्याने दिवसागणिक कोरोनाने बाधित होणाऱ्यांची संख्या आणि त्यामुळे मृत्यू पावणाऱ्याची संख्या विक्रमी आकडे गाठत आहे. एकीकडे असे चित्र असताना कोरोनाच्या या काळात कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या 25 ते 30 टक्के मृत्यू हे सारी आजाराने झाल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर आतापर्यंत दोन हजार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, त्याच्या पंचवीस टक्के म्हणजेच 500 जणांचा मृत्यू हा मागील वर्षापासून आतापर्यंत झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
कोरोना हा मागील वर्षभरापासून आलेला आजार असला तरी सारी हा मात्र जुनाच आजार आहे. श्वसन विकार, न्युमोनिया, टीबी या सारख्या विकाराचं गंभीर रुप झाल्याने फुफ्फुसाला इंफेक्शन होते. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो, ऑक्सिजन पातळी कमी होऊन त्याचा परिणाम शरीराच्या सर्व भागावर होऊन रुग्णाचा मृत्यू होतो. या आजाराला सारी म्हटलं जातं. पूर्वीपासून असलेला हा आजार पुढील काळात देखील राहण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या आजाराप्रमाणेच याची लक्षणे असतात. सुरुवातीला सर्दी, खोकला होतो तो वाढत जाऊन न्युमोनिया होतो. न्युमोनियामुळे फुफ्फुसात इंफेक्शन पसरत जाते आणि पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावतो, अशा पद्धतीने सारीच्या रुग्णांचा मृत्यू होतो.
सर्दी, ताप, खोकला ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत, तिच लक्षणे सारीची सुद्धा आहेत. या लक्षणाच्या आधारे कोरोनाची चाचणी केली जाते, ती पॉझिटिव्ह आली तर कोरोना समजला जातो आणि ती निगेटिव्ह आली तर तो सारी आजार समजला जातो. दोघांची लक्षणे सारखीच असल्याने उपचार देखील जवळजवळ सारखेच आहेत.
सुरुवातीच्या काळातच या दोन्ही आजारात रुग्णांवर उपचार सुरु झाले तर रुग्ण लवकर बरा होण्याची जास्त शक्यता असते आणि उशीर केला तर रुग्ण दगावण्याची शक्यता बळावते. यासाठी वेळीच औषधोपचार जेवढा महत्त्वाचा असतो तेवढाच श्वसनाचे व्यायाम करणे, प्राणायाम करणे हे देखील उपाय म्हणून केले तर या आजारावर सहज मात करणे शक्य आहे.
सारी आणि कोरोना या दोन्ही विकारात लक्षणे सारखीच असल्याने उपचार पद्धती ही सारखीच आहे मात्र बुरशीजन्य आजार रुग्णात जास्त असेल तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे अधिक असते आणि व्हायरल इन्फेक्शन असेल तर बरे होण्याचे प्रमाण कमी असल्याचंही दिसून येते, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.