(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कांदाप्रश्नी राज्य नाही तर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज : शरद पवार
कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसेच कांद्याच्या दरात कायम चढ उतार होणं ही चिंतेची बाब असून कांदा आयात निर्यतीचे सर्व अधिकार केंद्राकडे असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नाशिक : केंद्र सरकारच्या विरोधाभासी धोरणामुळेच कांद्याचा तिढा उद्भवल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. दरम्यान, कांदा व्यापाऱ्यांनी आता लिलाव सुरु करावेत, असं आवाहनही शदर पवार यांनी यावेळी बोलताना केलं. कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत व्यापारी, शेतकरी यांच्या बैठका सुरु आहेत.
शरद पवार बोलताना म्हणाले की, 'महाराष्ट्रच्या जिल्ह्याची वैशिष्ट्य आहेत त्यापैकी नशिक एक. कांदा प्रश्न उदभवला नाही आणि नाशिकला आलो नाही असं होत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या कांद्यात नाशिकचा कांदा असतो. राजस्थान, गुजरातमध्ये कांदा लागवड होते, पण नाशिकच्या कांद्याचा दर्जा पहिला क्रमांकाचा असतो. कांद्याच्या दरात कायम चढ उतार आहेत, हा कठीण प्रश्न आहे. यावर राज्य सरकारने नव्हे तर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज आहे. राज्य सरकारकडून फारशी अपेक्षा करू नये, कारण राज्य सरकारकडे काही अधिकार नाहीत. निर्यात, आयात यात राज्य सरकारचा सबंध नाही. हे सर्व अधिकार केंद्राचेच असतात.'
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'कांद्याचा व्यापार हा सुरु ठेवला पाहिजे. खरं म्हणजे, व्यापारी बंधुंनी हा निर्णय घेतला पाहिजे. मार्केट बंद ठेवणं या गोष्टीचा फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. मार्केट सुरु ठेवा, त्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या आपण एकत्र सोडवू. तुम्हाला त्रास होतोय ही गोष्ट मंजूर आहे. पण तुम्हाला त्रास होतोय म्हणून उत्पादकांनाही त्रास व्हावा ही तुमची भावना नाही, असं मी समजतो. म्हणून यासंदर्भात फेरविचार करा.'
शरद पवार म्हणाले की, 'यासंबंधी केंद्र सरकारचे जे संबधित प्रतिनिधी आहे त्यांची भेट घेणार आहे. व्यवहार सुरळीत होणार यासाठी केंद्राने पुढाकार घेणं गरजेचं आहे. कांद्याचा भाव वाढला की, लासलगावला धाड टाकली जाते. लासलगाववर आयकर विभागाचे प्रेम आहे. याबाबतही त्यांच्यासोबत बोलणार आहे.' तसेच अतिवृष्टी संदर्भात राज्य सरकार अधिक निर्णय घेत असून लवकरच निर्णय जाहीर करतील, असंही शरद पवारांना बोलताना सांगितलं.