Nashik Udhhav Thackeray : दादा भुसेंच्या होम ग्राउंडवर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा, मालेगावमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार
Nashik Udhhav Thackeray : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची तोफ रविवारी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धडाडणार आहे.
Nashik Udhhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची तोफ रविवारी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धडाडणार आहे. मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून मागील दोन दिवसात राजकीय वातावरण तापलं असून या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चांगलंच कामाला लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून ते आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि इतर नेत्यांचे राज्यभरात अनेक सभा, दौरे, मेळावे होत आहेत. यात उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हे देखील मैदानात उतरले असून त्यांनी रत्नागिरीतील खेड (Khed) येथून पहिल्या जाहीर सभेची सुरुवात केली. त्यानंतर आता ते मालेगावात (Malegaon) येऊन धडकणार आहेत. उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये येत असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून नाशिकसह मालेगावचे वातावरण भगवामय झाल्याचे चित्र आहे. मालेगाव येथील एमएसजे महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आले आहे.
एकीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांची नुकतीच शिवतीर्थावर गुढीपाडव्याच्या दिवशी जंगी सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेना ठाकरे गटावर चांगलाच निशाणा साधला. त्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात रोजच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर नुकताच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरासह राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे या सभेत काय बोलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून दादा भुसे हे निवडून आले आहेत. सध्या ते नाशिकचे पालकमंत्री असून एक मंत्रीपदाचा कार्यभार देखील ते सांभाळत आहेत. मात्र शिवसेना फुटल्यानंतर ते बाहेर पडले आणि शिवसेना शिंदे गटात गेल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट एकाकी पडला होता. अशातच मालेगावमधून भाजपचे अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत भाजपसह शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का दिला. याच पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यासह परिसरात शिवसेना ठाकरे गट संपर्क वाढवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही सभा असल्याचे सांगितले जात आहे. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यातही मालेगाव मतदारसंघ आता शिवसेनेकडेच राहणार असे सुतोवाच देखील संजय राऊत यांनी आज सकाळी मालेगाव येथे बोलताना दिले. त्यामुळे निश्चितच उद्या होणारी सभा ही महत्त्वाची असणार आहे. उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.