Nashik News: राज ठाकरे यांच्या भाषणानंतर नाशिकमधील एका दर्ग्याच्या जागेचा मुद्दा चर्चेत, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Nashik News: गंगापूर रोडवरील प्रसिद्ध नवश्या गणपतीला लागूनच असलेल्या दर्ग्याचे अनाधिकृत बांधकाम हटवण्याबाबत सरकारलाही यावेळी इशारा देण्यात आला.

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणानंतर अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा हा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतोय. मुंबई, सांगली पाठोपाठ आता नाशिकमधील (Nashik News) एका दर्ग्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला असून हे अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडण्याची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे.
नाशिकच्या ईदगाह मैदानावर बुधवारी सायंकाळी हिंदू हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला अनेक साधू महंतांनी हजेरी लावली होती. लव्ह जिहाद, धर्मांतरण, हिंदूंवर होणारे अन्याय, बांगलादेशी घुसखोरी यावर या सभेत आवाज उठवण्यात आला. यासोबतच नाशिक शहरात मुस्लिमांकडून धार्मिक स्थळांवर होणाऱ्या अतिक्रमणांचा मुद्दा या सभेत गाजला. गंगापूर रोडवरील प्रसिद्ध नवश्या गणपतीला लागूनच असलेल्या दर्ग्याचे अनाधिकृत बांधकाम हटवण्याबाबत सरकारलाही यावेळी इशारा देण्यात आला.
दर्ग्याबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त
विशेष म्हणजे, गुरुवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्यांनी नवश्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन करत हजरत सैय्यद हसन रांझेशाह बाबा रहेमतुल्लाह अलैह दर्ग्याची पाहणी केली. त्यानंतर हा दर्गाच पूर्ण अनधिकृत असून हे बांधकाम पाडण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी त्यांनी मागणी केली. दरम्यान यावेळी कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकऱ्यांसह पोलिसांचा चोख बंदोबस्त दर्ग्याबाहेर तैनात करण्यात आला होता. एकीकडे दर्ग्याचे बांधकाम हटविण्याची मागणी केली जात आहे. संबंधित जागेची पाहणी केली जाईल आणि अनाधिकृत बांधकाम असेल तर नियमाप्रमाणे ते हटवले जाईल असे स्पष्टीकरण नाशिक महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहे.
राज ठाकरेंच्या भाषणात कुपवाडमधील मशीद बांधकामाचा मुद्दा उपस्थित
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत माहीम आणि सांगलीमधील कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनीमधील अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे कुपवाड भागातील त्या वादग्रस्त जागेचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस याठिकाणी मशीद बांधकामाच्या वादातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी संजय नगर पोलिस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते.
राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत माहीमच्या समुद्रातील मजारीबाबत उपस्थित केलेला प्रश्न असो किंवा हिंदू हुंकार सभेत मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांबाबत उठवलेला आवाज असो यामुळे सध्या राज्यभर वातावरण तापले आहे. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली. मात्र आता नाशिकबाबत प्रशासन नक्की काय भूमिका घेतय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
