Nashik Ekanth Shinde : शेतकऱ्यांनी बांधावरच मांडला अवकाळीचा पाढा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले....
Nashik Ekanth Shinde : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
Nashik Ekanth Shinde : बागलाण (Baglan) तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये बेमोसमी पाऊस (Unseasonal rain), वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवून यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.
नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात अवकाळी पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीपिकांचे अतोनात (Crop Damage) नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरवल्याचे चित्र जिल्हाभर आहे. अशा स्थितीत अयोध्या (Ayodhya Tour) दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक गाठत शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. शिंदे यांनी बागलाण तालुक्याचा अचानक दौरा करत येथील नुकसानग्रस्त भागातील शेतीची पाहणी केली. काढणीला आलेला कांदा गहू भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. अशातच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसाग्रस्त भागात जाऊन पीक पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाने, निताणे, आखतवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उतराने, तर सटाणा, शेमळी, अजमीर सौंदाणे, चौगाव, कर्हे,ब्राह्मणगाव, लखमापुर, आराई, धांद्री आदी गावांत शनिवारी दि. 8 एप्रिल,2023 रोजी बेमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिजोटे, आखतवाडे, निताणे आदी गावांतील नुकसानीची पाहणी केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डांळीब, पपई व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, बागलाण प्रांत बबन काकडे, तहसिलदार जितेंद्र इंगळे, गट विकास अधिकारी पी.एस.कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, नितानेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यात नुकसान
नाशिकसह जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. या पावसामुळे द्राक्षासह कांदा, गहू, मका, टोमॅटो, ज्वारी आणि भाजीपाल्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नांदगाव, देवळा, निफाड, सिन्नर, इगतपुरी, चांदवड, सुरगाणा, मनमाड, बागलाण या तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास असा हिरावला जात असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.