Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा 25 टक्क्यांवर
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
LIVE
Background
Maharashtra Rain Update : राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
'या' भागात आज रेड अलर्ट!
गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातलाय. आता याचं पावसानं मध्य महाराष्ट्र, विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाडही आपल्या कवेत घेतलाय. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये कालपासून तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसणार असल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे. नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी
यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल. त्यानंतर बीचवर जाऊ नये अशी सूचना महापालिकेनं दिली आहे. अलर्टच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी लाईफगार्ड, स्पीड बोटस्, अग्नशमन दलाची संरक्षक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी देखील पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत होता. हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, पुण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरातली परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आव्हान हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलं आहे.
परशुराम घाट 9 जुलैपर्यंत वाहतूकीसाठी बंद
मुंबई-गोवा महामार्गानं कोकणात जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. चिपळूणमधील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परशुराम घाट कालपासून बंद करण्यात आला असून तो 9 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. घाटात धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार हजेरी
दरम्यान, जुलैच्या सुरुवातीपासून राज्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावलीय. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात. दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
भिवंडीत कामवारी नदीत पोहाण्यासाठी गेलेला तरुण गेला वाहून..
मागील दोन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे कामवारी नदीची पातळी वाढली आहे त्यामुळे परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे परंतु या उलट भिवंडी शहरालगत असलेली कामवारी नदी मध्ये जीव धोक्यात टाकून पोहण्याचा आनंद घेत असतात मात्र याकडे प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे अशातच पोहण्याचा आनंद घेत असताना शहरातील अवचित पाडा येथील राहणारा 19 वर्षाचा तरुण अंसारी आसिफ हा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. याची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरु केले असून नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती परंतु अजूनही या मुलाचे मृतदेह सापडलेले नाही त्यामुळे अंधार झाल्याने सध्या शोध कार्य थांबवण्यात आले असून उद्या पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
12 जुलैपर्यंत रत्नागिरीत अति मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 08 जुलै 2022 ते 12 जुलै 2022 या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बेळगाव जिल्ह्यात चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीच्या आणि उप नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; आतापर्यंत 4 पूल पाण्याखाली
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीच्या आणि उप नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून चार पूल पाण्याखाली गेले आहेत. महाराष्ट्रातील कोकणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे चिकोडी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चिकोडी तालुक्यात देखील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे. चार पुलांवर पाणी आल्यामुळे त्या पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली असून तेथे बॅरिकेड्स लावून पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदी आणि तिच्या उप नद्या असणाऱ्या वेदगंगा, दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. येडुर - कल्लोळ, मांजरी - सौंदत्ती, मलिकवाड - दत्तवाड आणि एकसंबा - दानवाड मार्गावरील पूल हे पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक बंद आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी किनारी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी आपले पंप सेट हलवण्यास प्रारंभ केला आहे. कृष्णा आणि अन्य नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने एनडीआरएफची पथके खबरदारीचा उपाय म्हणून तैनात करण्यात आली आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी
जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र आज सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पावसाला सुरुवात झाली असून बळीराजाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात अनेक भागात शेतकऱ्यांनी धूर पेरणी केली होती. मात्र पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे टाकले होते .मात्र आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून आज झालेल्या पावसामुळे काही अंशी पाणी साठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आज झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
चंद्रपूरमध्ये पावसाचा हाहा:कार
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-चिमूर मार्गावर पुराचे पाणी साचल्याने वाहनचालकांना आज मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या महामार्गावर सालोरी येथे पूल निर्मितीसाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र उंच महामार्गामुळे लगतच्या शेतातील पाणी सालोरी नाल्याजवळ वेगाने प्रवाहित झाले आणि पर्यायी रस्ता वाहून गेला. रस्ता वाहून गेल्याने या महामार्गावर जवळपास एक तास वाहतूक ठप्प होती. पाणी उतरल्याने आता वाहतूक पूर्ववत झाली मात्र गेली अनेक वर्षे चिमूर-वरोरा हा महामार्ग रखडल्याने या मार्गावर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. महामार्गा लगतच्या शेतांना देखील पावसाचे पाणी जमा झाल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे धीम्या गतीने काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करून हा महामार्ग तातडीने पूर्ण करण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे.