(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तृतीयपंथीय कल्याण महामंडळ कधी कार्यान्वित होणार? मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली महत्त्वाची माहिती
Transgender Welfare Board : महाराष्ट्रात तृतीयपंथी कल्याण महामंडळ येत्या दोन महिन्यात कार्यान्वित होणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
Transgender Welfare Board : विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील असून तृतीयपंथीयांसाठी कल्याण महामंडळ येत्या दोन महिन्यांत कार्यान्वित करणार असल्याची ग्वाही सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी मंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. गुरुवारी विधानसभेत तृतीयपंथीय कल्याण महामंडळासंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते.
तृतीयपंथीयांच्या विविध समस्या आहेत. समाजात त्यांना उपेक्षित वागणूक दिली जाते. हे ध्यानात घेऊन, तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या महामंडळावरील अशासकीय सदस्यांची नेमणूक प्रक्रिया थांबलेली होती. परंतु येत्या दोन महिन्यांत ही नेमणूक प्रक्रिया पूर्ण करून महामंडळ कार्यान्वित केले जाईल, असे शंभूराज देसाई यांनी विधानसभेत स्पष्ट केले. याशिवाय विभागीय स्तरावर महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशी मंडळे स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. त्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नेमणुका दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येतील, हेही त्यांनी यावेळी सांगितले.
तृतीयपंथीयांना बिजभांडवल उपलब्ध करून देण्याबाबतची योजना प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने त्यांना नवीन शिधापत्रिका वितरित करण्यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस सेवेत तृतीयपंथीयांना संधी मिळावी यादृष्टीने पोलीस सेवा प्रवेशाच्या नियमांतदेखील शासनाने सुधारणा केल्या आहेत, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. याशिवाय तृतीयपंथीयांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून समितीचा अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्याची सूचना देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. समितीचा अहवाल तपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली कृती कार्यक्रम आखला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.
तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री आग्रही
तृतीयपंथीयांना कल्याण महामंडळाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तृतीयपंथीयांचे एक शिष्टमंडळ आले होते. त्यांच्या निवेदनाचा स्वीकार करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वस्त केले असल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली. पुणे महापालिकेच्या धर्तीवर खासगी सुरक्षारक्षक अथवा अन्य सेवांमध्ये तृतीयपंथीयांना संधी देण्यासंदर्भात सर्व महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना देण्यात येतील. तसेच पोलीस ठाण्यांमध्ये तृतीयपंथीयांच्या रास्त तक्रारी जाणून घेऊन त्यांना चांगली वागणूक देण्यासंदर्भात पोलीस महासंचालक आणि सर्व पोलीस आयुक्तांना सूचना देण्यात येतील, अशी ग्वाहीदेखील शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली.