हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकरांची वाट पोलिसांनी अडवली
सीमालढ्यामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जातेवेळी यड्रावकरांची वाट पोलिसांनी अडवली. यावेळी समर्थकांमध्ये एकच नाराजी पाहायला मिळली.
बेळगाव : सीमालढ्यामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना रविवारी महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे अभिवादन करण्यात आलं.या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर हेसुद्धा बेळगाव दिशेनं निघाले होते. पण, कर्नाटक पोलिसांनी त्यांना रोखलं.
यड्रावकर हे कोल्हापूरातील जयसिंगपूर येथून बेळगावकडे निघाले असतानाच कर्नाटक - महाराष्ट्र सीमेवर त्यांना रोखण्यात आलं. यावेळी यड्रावकर यांच्या सोबत असणाऱ्या समर्थकांनी कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या. कर्नाटक पोलिसांकडून मराठी भाषिकांबाबत केला जाणारा दुजाभाव पुन्हा एकदा या घटनेतून पाहायला मिळाला.
मागील वर्षीही असाच प्रकार घडला होता. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नेते महाराष्ट्रातून जात असतात. पण मागील दोन ते तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील नेत्यांना या ठिकाणी प्रवेश न दिल्याच्या घटना घडल्या आहेत. यंदाही त्याची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, यड्रावकरांना अडवल्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यानं डोकं वर काढलं आहे. राजकीय वर्तुळातही याबाबत बऱ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बेळगावात दौऱ्यावर आहेत. याच प्रसंगी घटनेनुसार देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचा सामान्य नागरिकांचा हक्क नाकारला जातो आहे, असं म्हणत आम्ही कर्नाटक पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करतो या शब्दांत यड्रावकरांनी झाल्या घटनेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
तर, अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान, शेतकऱ्यांनी अमित केंद्रीय गृहमंत्र्यांना 'गो बॅक' म्हणत अर्थनग्नावस्थेत लोटांगण आंदोलनही केलं. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली गेल्याचं यावेळी पाहायला मिळालं.