"प्यार किया तो डरना क्या.? शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांकडून धनंजय मुंडेची पाठराखण
धनंजय मुंडे आणि सदर महिलेचे संबंध लपून राहिलेले नाहीत. धनंजय मुंडे यांनी स्वत: सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची त्यांनी कबुली दिली आहे, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.
जालना/शिर्डी : सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. धनंजय मुंडेंच्या अडचणीच्या वेळी शिवसेना त्यांच्या मदतीला आली आहे. प्यार किया तो डरना क्या म्हणत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
धनंजय मुंडे आणि सदर महिलेचे संबंध लपून राहिलेले नाहीत. धनंजय मुंडे यांनी स्वत: सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची त्यांनी कबुली दिली आहे. या विषयावर बोलताना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची त्यांनी आठवण काढली. प्यार किया तो डरना क्या? असं बाळासाहेब ठाकरे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना म्हणाले होते, याची आठवण सत्तार यांनी यावेळी करुन दिली.
दरम्यान शपथ पत्रात धनंजय मुंडे यांनी लपवलेल्या माहिती विषयीच्या आरोपावर सत्तार यांनी भाजपच्या अनेक नेत्यांचीही अशी निवडूक आयोगाकडे माहिती लपवली असून योग्य वेळी आपण त्यांची नाव आणि पत्ते जाहीर करु असा इशारा दिला.
धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! आमदारकी धोक्यात? कायदा काय सांगतो?
सत्यता न पडतळता निष्कर्ष काढणे अयोग्य- जयंत पाटील
राजकारणात आयुष्य उभं करायला आणि राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट लागतात. कुणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येण योग्य नाही, असं मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरणी बोलताना जयंत पाटील यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. हायकोर्टात देखील यापुर्वीच अर्ज दाखल केलाय. ही न्यायालयीन बाब आहे, अंतर्गत कुटुंबातील बाब आहे आणि धनंजय मुंडेनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलंय. तर राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना, कुणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचणे योग्य नाही. याबाबत चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे. त्यामुळे कुणी आरोप केला की सत्यता न पडतळता निष्कर्ष काढणे अयोग्य असल्याच मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
रेणू शर्मा यांनी मुंडेंवर काय आरोप केलेत?
रेणू शर्मा या महिलेने ट्विटरवरुन धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केली. तसेच बलात्कार करून शारीरिक शोषण केल्याचा आरोप शर्मा यांनी केलाय. पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर रेणू शर्मा यांनी सलग ट्विट करत पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. धनंजय मुंडे यांनी मला ट्विटरसहीत सगळीकडे ब्लॉक करण्यामागचं कारण काय? असा सवाल रेणू यांनी केला आहे. पोलिसात तक्रार दाखल करताच मुंडे यांनी पुन्हा अनब्लॉक केल्याचंही शर्मा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केले आहे.