(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उदय सामंतांचे बंधू शिंदे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता, किरण सामंतांकडून मोर्चेबांधणी
रत्नागिरीतील राजकारणात त्यांची किंगमेकर म्हणून ओळख आहे. पण आता हेच किरण सामंत राज्यात झालेल्या मोठ्या एका राजकीय उलथापालथीनंतर शिंदे गटासाठी काम करताना दिसून येत आहेत.
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) तसा मोठा अवधी राहिला नाही. प्रत्येक पक्ष निवडणुकीसाठी झटताना दिसतोय. याच दरम्यान आता कोकणात उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत हे बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार असणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण सध्या किरण सामंत पक्ष बांधणीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फिरताना दिसून येत आहेत. मुख्य बाब म्हणजे किरण सामंते आतापर्यंत पडद्यामागे सक्रिय होते.
रत्नागिरीतील राजकारणात त्यांची किंगमेकर म्हणून ओळख आहे. पण आता हेच किरण सामंत राज्यात झालेल्या मोठ्या एका राजकीय उलथापालथीनंतर शिंदे गटासाठी काम करताना दिसून येत आहेत. दरम्यान, दीपक केसरकर यांनी भाजपा ही जागा आमच्यासाठी सोडेल असा विश्वास व्यक्त करताना उमेदवार कोण हे अद्याप ठरलं नाही असं म्हटलं आहे. पण किरण सामंत यांचा मागच्या काही दिवसांमध्ये दोन्ही जिल्ह्यांच्या राजकीय क्षेत्रात फ्रंट फूटला असलेला वावर बरंच काही सांगून जातोय. त्यामुळे पडद्यामागची ही व्यक्ती पक्ष बांधणीसाठी आता फ्रंट फुटला येऊन काम करत असल्याने शिंदे गटाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खासदारकीचा चेहरा असेल का? याबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
शिवाय काही राजकीय जाणकार देखील किरण सामंत आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिलेले दिसल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी प्रतिक्रिया देत आहेत. या सर्व घडामोडींबद्दल किरण सामंत यांनी उघडपणे प्रसारमाध्यमांकडे आपली भूमिका मांडली नाही. पण त्यांची जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात वाढलेली उठबस नेमकं काय सूचित करते, याबाबत मात्र चर्चाही होतच राहणार आहे.
किरण सामंत आतापर्यंत राजकारणात फ्रंटफुटला दिसले नाहीत. पण, पडद्यामागून सूत्र हालवण्यात त्यांचा हातखंडा असल्याचं अनेक जण सांगतात. त्यामुळे त्यांना किंगमेकर देखील म्हटलं जातं. मंत्री उदय सामंत यांच्या पाठीमागे किरण सामंत कसे खंबीरपणे उभे आहेत? याच्या विविध चर्चा देखील ऐकायला मिळतात. उदय सामंत यांच्या मतदारसंघात किरण सामंत यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात असतो. कार्यकर्त्यांची गाठीभेटी, अडलेली कामं करण्यासाठी किरण सामंत यांच्याकडे देखील मोठ्या संख्येनं लोकं येत असतात. उदय सामंत हे आमदार, मंत्री असले तरी कार्यकर्ते, मतदार यांना बांधून ठेवण्यामागे त्यांचे वडिल अण्णा सामंत, भाऊ किरण सामंत यांचं योगदान देखील मोठं असल्याचं मानलं जातं. त्यामुळे किरण ऊर्फ भैय्या सामंत यांना 'किंगमेकर' म्हणून देखील संबोधले जाते.