Maharashtra Breaking News 19 May 2022 : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच सात हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मध्य प्रदेशमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण, महाराष्ट्रात काय होणार?
मध्य प्रदेशमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर आता ठाकरे सरकार कोणतं पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे. पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसतंय. चारच दिवसापूर्वी कोर्टाने महाराष्ट्राला ज्या सूचना केल्या होत्या त्याच सूचना मध्य प्रदेश सरकारलाही केल्या होत्या. मग चार दिवसात असा काय चमत्कार झाला. असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या मुद्द्यावर आज दिवसभर राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि वाराणसी कोर्टात आज सुनावणी
वाराणसी जिल्हा कोर्टात ज्ञानवापी सर्व्हे संदर्भात अॅडव्होकेट कमिश्नर विशाल सिंह आज दुपारी 2 वाजता आपला रिपोर्ट सादर करणार आहेत. तसेच अन्य दोन याचिकांवर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. एका याचिकेत प्रतिवादी महिलांनी नंदीच्या समोरची भिंत तोडून तपास करण्याची मागणी केली आहे. दुसरी याचिका सरकारी वकिलांकडून दाखल करण्यात आली आहे. यामध्ये तीन मुद्यांवर भर देण्यात आला. मात्र वकिलांच्या संपामुळे बुधवारी सुनावणी होऊ शकली नाही.
सर्वोच्च न्यायालयात वाराणसीचे अंजुमन इंतजामिया मशिदीने याचिका केली आहे. ज्यात खालच्या कोर्टाने दिलेले सर्व आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने त्या परिसरात सापडलेले शिवलिंग सुरक्षित करायला सांगितले होते आणि मुस्लिमांना नमाजासाठी परवानगी दिली होती. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दुपारी 12 वाजता सुनावणी होणार आहे.
संदीप देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
संदीप देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज फैसला होणार आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या जामीनाला मुंबई पोलिसांनी जोरदार विरोध केला असून हे दोघेही अद्याप फरार आहेत. पोलिसांच्या कामात अडथळा, ताब्यात घेत असताना एक महिला पोलीस जखमी झाल्या होत्या. त्या गाडीचा चालक आणि गाडीत बसलेल्या मनसे शाखाध्यक्षांच्या जामीनावरही कोर्ट आज निर्णय देणार आहे.
बालगंधर्व पाडण्यास कलाकारांचा विरोध, आज आंदोलन
पु ल देशपांडे यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. यावेळी त्यासाठी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ लाभली आहे. दोन वर्षांपूर्वी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा डाव पुणेकरांच्या विरोधामुळे उधळला होता. त्यावेळी राष्ट्रवादीकडून देखील बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध करण्यात आला होता. मात्र आता पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बालगंधर्व रंगमंदिरच्या पुनर्विकासाचे प्रेझेंटेशन देण्यात आलं. यानंतर अजित पवार यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. याच मुद्द्यावर, बालगंधर्व रंगमंदीर पाडण्यास विरोध करण्यासाठी सकाळी 10 वाजता कलाकार आंदोलन करणार आहेत.
हवामान बदलासंबंधी जागतिक संघटनेकडून अहवाल प्रसिद्ध
हवामान बदलासंदर्भातले जबाबदार घटनांमध्ये अनेक उच्चांक बघायला मिळतायत. 2021 सालात यातील 4 प्रमुख घट असलेल्या ग्रीनहाऊस गॅसेसची पातळी, महासागराचे तापमान, त्याचे ॲसिडिफिकेशन आणि समुद्राच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ यांनी नवा उच्चांक गाठलाय. जागतिक हवामान संघटनेकडून क्लायमेट चेंजसंदर्भातला महत्त्वपूर्ण रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आलाय. भारतसोबतच इतर देशांना हा अहवाल धोक्याचा इशारा आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमीसंबंधी आज सुनावणी
श्रीकृष्ण जन्मभूमी मथूरा येथील शाही ईदगाह संदर्भात वकील रंजना अग्निहोत्री आणि इतर कृष्ण भक्तांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. यात 1969 साली श्रीकृष्ण जन्मस्थळ सेवा समिती आणि शाही ईदगाह व्यवस्था समिती मध्ये झालेला करार अवैध असल्याचा दावा केला आहे. कारण या दोन्ही समितीला असा करार करण्याचे काही अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. यावर आज ही याचिका सुनावणी योग्य आहे की नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्री. स्वामीनारायण मंदिराकडून आयोजित करण्यात आलेल्या युवा शिबिराला सकाळी 10.30 वाजता संबोधित करणार आहेत.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून कार्यक्रम
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून आयोजित 'वंशवादी राजनीतिक दलो से लोकतांत्रिक शासन को खतरा' या विषयावर एक संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. यात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार आहे.
Pandharpur: वादळी वारे आणि पावसामुळे पंढरपुरात बेदाणा आणि शेवग्याचे मोठ नुकसान
अचानक आलेल्या पावसामुळे बेदाणा, डाळिंब, शेवगा , केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील शेतकरी शिवाजी हळणवर यांच्या बेदाणा शेडवरील पत्रे व कागद उडाल्याने सहा लाख रुपयांचा तीन टन बेदाण्याचे नुकसान झाले आहे.
तर पळशी येथील शेतकरी शेवाळे यांची दोन एकरावरील शेवग्याची बाग जमिनदोस्त झाली आहे. यामध्ये त्यांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेची नालेसफाई अडकली निविदा प्रक्रियेत
उल्हासनगर महापालिकेत पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या नालेसफाईला अजून सुरुवातच झालेली नाही. कारण पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या नालेसफाईची महापालिकेकडून निविदा प्रक्रियाच अजून पूर्ण झालेले नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईला अजून सुरुवातच नाही
Buldhana : कंपनीने थकवले अडत्यांचे 15 कोटी ,व्यापाऱ्यांची कंपनीवर धडक
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील काही अडते व व्यापाऱ्यांचे सोयाबीनचे खरेदीदार दुर्गाशक्ती फुड प्रायव्हेट लिमिटेड, खामगाव यांनी सोयाबीन, सूर्यफूल व भूईशेंग खरेदी करून सदर अडत्यांना महिन्याभरापासून पेमेंट केले नाही. मागणी करूनही पैसे मिळत नसल्यामुळे आज जवळपास बाजार समितीच्या 100 च्या वर अडते व व्यापारी हे तलाव रोडवरील दुर्गाशक्ती फुडस् प्रॉडक्ट प्रा. लि. वर धडकले. यावेळी त्यांनी अडकलेल्या कोट्यवधी रूपयांची मागणी केली. दरम्यान कंपनीचे चालक सुरेका व अडते व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला. अखेर दोन्ही पक्षात बोलणी होऊन उद्या बैठक बोलावण्यात आली आहे. तर उद्या खामगाव बाजार समिती बंद ठेवण्यात येईल असे अडते- व्यापाऱ्यांनी घोषित केले आहे.
Sangli: सांगलीत सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी
सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मागील दोन दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल झाला होता. ढगाळ वातावरण आणि उकाडा कायम असताना आज सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान सांगली शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
Share Market : शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांचे 6.36 लाख कोटी रुपयांचे नुकसान
शेअर बाजारात आज मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे तब्बल 6.36 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मार्च 2020 नंतर इन्ट्रा-डे मध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण झाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 430 अंकानी घसरला आहे.