Maharashtra Breaking News 17 July 2022 : पंढरपुरात बासुंदीतून 32 वारकऱ्यांना विषबाधा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jul 2022 09:22 PM
पंढरपुरात बासुंदीतून 32 वारकऱ्यांना विषबाधा 

पंढरपुरात बासुंदीतून 32 वारकऱ्यांना विषबाधा  झाली आहे. या वारकऱ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 65 एकर येथील विठ्ठल मठातील 12 ते 32 वयोगटातील  वारकऱ्यांना विषबाधा झाली आहे. 

गडचिरोली:-- जिल्हा प्रशासनाने सिरोंचा येथील शाळा-महाविद्यालयांना 23 जुलै पर्यंत सुट्टी

गडचिरोली:-- जिल्हा प्रशासनाने सिरोंचा येथील शाळा-महाविद्यालयांना 23 जुलै पर्यंत सुट्टीची केली घोषणा, जिल्ह्यातील पूरपरिस्थिती बघता गेले 8 दिवस संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक संस्था होत्या बंद, नव्या आदेशानुसार सिरोंचा वगळता जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सोमवारपासून शाळा-महाविद्यालये सुरळीत सुरु होणार, मात्र सिरोंचा तालुक्यात आणखी काही काळ पूरस्थिती कायम राहण्याची शक्यता, या तालुक्यातील शाळा-महाविद्यालयात सध्या आहेत तात्पुरत्या स्वरूपातील शेल्टर होम, अनेक अंतर्गत मार्ग पुराच्या पाण्याने बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यात होत आहेत अडचणी

राष्ट्रीय समाज पक्षात उभी फूट? बारामतीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

शिवसेनेत सुरू झालेल्या बंडाचे सत्र सुरू असतानाच आता राष्ट्रीय समाज पक्षात देखील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये उभी फूट पडली आहे का असा सवाल निर्माण झाला आहे. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बारामती येथे आज बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या सत्तात्याने बदलत्या भूमिकेला कंटाळून त्यांची साथ सोडण्याचा निर्णय या पदाधिकाऱ्यांनी घेतला या बैठकीला 22 जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय समाज पक्षामध्ये धुसपुस सुरू असल्याची चर्चा सुरू होती. आज झालेल्या बैठकीत ही खदखद बाहेर पडली असल्याचे चित्र आहे. आज बारामती तालुक्यातील उंडवडी येथे झालेल्या एल्गार परिषदेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या विचारसरणीला बाजूला ठेवत कार्यकर्त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले त्यामध्ये धनगर आरक्षणाचा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला याशिवाय धनगर समाजाचे प्रश्न यशवंत सेनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे या  पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पक्षाचे नेतृत्व कार्यकर्त्यांना हीन वागणूक देत असल्याने त्याला कंटाळून आम्ही त्यांचे साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि त्यातून उभा राहिला आहे त्यामुळे यापुढे पक्षावर आमचाच हक्क आहे पक्षावर आमचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी कायदेशीर लढाई देखील लढण्याची तयारी असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

शरणागती मेळाव्यात 155 आरोपींनी पत्करली शरणागती

अहमदनगर - अहमदनगरला जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पारधी समाजाचे फरार आरोपी पुनर्वसन आणि शरणागती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.... पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील फरार असलेले आरोपी हे मिळून येत नव्हते अशा आरोपींचे समुपदेशन करून त्यांचे प्रमाणपत्र आणि गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आलाय... या उपक्रमाला प्रतिसाद देत तब्बल 155 आरोपींनी शरणागती पत्करलीये... तर यात  35 आरोपी गंभीर गुन्ह्यातील आहेत... या कार्यक्रमासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी मार्गदर्शन केलं... सामाजिक परिवर्तन विकासासाठी आवश्यक असत  असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलय... तर पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आजचा मेळावा होता असं त्यांनी म्हटलंय.

Aurangabad: औरंगाबादच्या दौलताबाद घाटात प्रचंड ट्रॅफिक जाम

Aurangabad News: औरंगाबादच्या दौलताबाद घाटात प्रचंड ट्रॅफिक जाम झाली आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्याप्रमाणावर पर्यटक वेरूळ लेणी पाहण्यासाठी जात असतात. त्यातच पहिल्यांदा झालेल्या जोरदार पावसानंतरचा आज पहिला रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास घाटात ट्रॅफिक जाम झाली आहे. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक

उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी शरद पवारांच्या निवासस्थानी थोड्याच वेळात बैठक... सहा जनपथ या निवासस्थानी जमणार विरोधी पक्षांचे नेते... बैठकीला शिवसेना, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्षासह अनेक पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती असणार... कोण असणार विरोधकांचा उमेदवार याची उत्सुकता... काल एनडीएनं पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उमेदवारी दिल्यानंतर विरोधकांच्या नावाची उत्सुकता





इंदापूर : सात कारवायांमध्ये 2 कोटी 86 लाख 3 हजार 920 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

इंदापूर पोलिसांनी  शनिवारी रात्री केलेल्या कारवाईत 93 लाख 23 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. इंदापूर पोलिसांनी आत्तापर्यंत सात कारवायांमध्ये 2 कोटी 86 लाख 3 हजार 920 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. इंदापूर पोलिसांनी शनिवारी रात्री 11 वाजता सरडेवाडी टोल नाका परिसरात नाकाबंदी दरम्यान कर्नाटक पासिंगंचा ट्रक पुण्याच्या दिशेने अवैद्य गुटखा घेऊन निघालेला असताना मोठ्या शिताफिने पकडला. याकारवाईत १६७ गोण्यात मानवी आरोग्यास घातक असलेला व विक्रीस बंदी असलेला 68 लाख 23 हजार 920 रुपये किमतीचा विमल कंपनीचा गुटखा आणि 25 लाख रुपये किमतींचा ट्रक असा एकूण 93 लाख 23 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी सदर ट्रक चालकास इंदापूर पोलीसांनी अटक केली आहे. सदर ट्रक चालक, मालकाविरुध्द अन्न आणि सुरक्षा अधिनियम तसेच भारतीय कलम 328 आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.


 





कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात टस्करचा धुमाकूळ सुरूच

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात (Ajara tehsil) टस्करचा धुमाकूळ (Tusker menace) सुरूच आहे. शुक्रवारी हत्तीने गवसे गावात उभ्या असलेल्या शेड, एक टेम्पो आणि दोन दुचाकींचे नुकसान केले. मुसळधार पावसामुळे आजरा-आंबोली मार्गावरील वाहतूकही सुमारे दोन तास खोळंबली. टस्कर बाजूला होईपर्यंत गोवा, आंबोली येथून येणारी वाहने अडकून पडली होती.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

पुणे : इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने श्री संत तुकाराम महाराज पालखी राष्ट्रीय महामार्ग टप्पा क्रमांक दोन वरती पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकाच व्यासपीठावर आले होते.

नवी मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन तासापासून सीबीडी येथील अपोलो रूग्णालयात

नवी मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन तासापासून सीबीडी येथील अपोलो रूग्णालयात आहेत


नातवाला या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण कुटूंब या ठिकाणी उपस्थित आहेत

देशव्यापी लसीकरणाचा विक्रम, 200 कोटी कोरोना लसींचा टप्पा पूर्ण

जगासह भारताही कोरोना विषाणूचा फैलाव सुरुच आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून सरकारकडून देशव्यापी कोरोना लसीकरणाची मोहिम राबवली. या पार्श्वभूमीवर भारताने मोठा विक्रम रचला आहे. देशव्यापी लसीकरणात भारताने 200 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा टप्पा पूर्ण केला आहे. देशात 548 दिवसांमध्ये कोरोना लसीचे 200 कोटीहून डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरणाचा 200 कोटी लसींचा टप्पा ओलांडल्याने पंतप्रधान मोदींनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा


 





शातील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, कृषीमंत्र्यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे देशातील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत, उत्पन्न वाढलेल्या 75 हजार शेतकऱ्यांच्या यशोगाथांचं संकलन असलेल्या ई-पुस्तकाचे प्रकाशन तोमर यांच्या हस्त झालं. यावेळी ते बोलत होते. देशात कृषीक्षेत्र आणि शेतकऱ्यांची प्रगती अत्यंत झपाट्यानं होत असल्याचेही तोमर यावेळी म्हणाले.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा





पीव्ही सिंधूची जबरदस्त कामगिरी! सिंगापूर ओपनमध्ये चीनच्या वांग झि यिवर पडली भारी

Singapore Open Badminton 2022 Final: सिंगापूर ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) चीनच्या वांग झि यि (Wang Zhi Yi) हीचा  21-9, 11-21, 21-15 असा पराभव केलाय. या कामगिरीसह पीव्ही सिंधू सुपर 500 विजेतेपदाची विजेती ठरलीय. पहिल्यांदाच पीव्ही सिंधूनं सिंगापूर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेनंतर सिंधू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

आरेमध्ये पर्यावरणवाद्यांकडून मेट्रो कारशेडविरोधात आजही आंदोलन

मेट्रो कारशेडच्या मुद्यावरुन राजकारण तापू लागलं आहे. शिंदे सरकारने आरेमध्ये मेट्रोचे कारशेड उभारण्याचे सूतोवाच केल्यानंतर पर्यावरणवाद्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. मागील काही रविवारपासून आरेमध्ये पर्यावरणवाद्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. आजही पर्यावरणवाद्यांनी आरे परिसरात आंदोलन सुरू केले.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर शिंदेंची नजर! 15 आमदार फोडणार, शिंदेंचा निर्धार

बीड : मुंडे बहिण-भावात श्रेयवादावरुन जुंपली, 100 कोटींचा निधी आपल्यामुळेच मिळाल्याचा दोघांचा दावा

बीड : परळीतील दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याच्या श्रेयवादावरुन आता मुंडे बहिण आणि भावात जुंपल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी हा निधी आपल्यामुळे मिळाल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही निधी आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा केला आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा


 


गोव्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू, 10 ऑगस्टला होणार मतदान

गोव्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सोमवार अर्थात उद्यापासून निवडणूक अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. येत्या 10 ऑगस्टला गोव्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गोवा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त डब्ल्यू व्ही रमणमूर्ती यांनी याबाबतची म्हणजे शनिवारी रात्री घोषणा केली. पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत याबातची माहिती देण्यात आली. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

तब्बल पाच महिन्यांनंतर मोसंबी बाजारपेठ गजबजली





परभणी : रस्ते अपघातांची थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून दखल

परभणी शहरातील रस्ते अपघातांची थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. परभणीतील आरटीआय कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांच्या मागणीला यश आलं आहे. परभणी शहरातील खानापूर फाटा ते असोला पाटी सहा किलोमीटर आणि विसावा कॉर्नर ते इस्सार पंप असा चार किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरण आणि पथदिव्यांसह दुभाजक करण्यास मान्यता मिळाली आहे.

सांगली : मुख्यालयाच्या हद्दीतून चंदनाच्या झाडांची चोरी

सांगलीत पोलीस मुख्यालयाच्या हद्दीतून पुन्हा एकदा चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरातून पुन्हा चंदनाच्या झाडांची चोरी झालीय. यापूर्वी दोन ते तीन वेळा पोलीस मुख्यालयाच्या हद्दीतून चंदनाच्या झाडांची तस्करी झाली आहे. चंदनाच्या झाडाच्या चोरीची विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे.


 





इंडिगोची पाकिस्तानात एमर्जन्सी लँडिग

पाकिस्तानमधील कराचीत इंडिगो विमानाला एमर्जन्सी लँडिंग करावी लागली. हे विमान शारजाहून हैदराबाद येथे होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात काही तांत्रिक बिघाड उद्भवल्याने विमानाची एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने हैदराबाद येथे आणण्यात येणार आहे. मागील दोन आठवड्यात दुसऱ्यांदा भारतीय विमानाला कराचीत एमर्जन्सी लँडिंग करावी लागली. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात होत असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर भारतीय इंधन कंपन्यांनी आजचे इंधन दर (Petrol Diesel Price Today 17 July 2022) जाहीर केले आहेत. इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, आजही इंधन दर स्थिर आहेत. राज्यात पेट्रोलचे दर अजूनही शंभर रुपयांहून अधिक आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्च्या तेलाचे दर घटले आहेत. मात्र, त्याचा दिलासा अजूनही भारतीय ग्राहकांना मिळाला नाही. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

पुणे : हडपसरमध्ये पत्राशेडची 12 घरं जळून खाक

पुण्यात हडपसरमध्ये पत्राशेडची 12 घरं जळून खाक झाली आहेत. यात एका विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांची काही पुस्तकं जळाली. वैदू वाडी झोपडपट्टीमध्ये ही घटना रात्री अडीचच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र सर्वच वस्तू जळाल्याने मोठं नुकसान झालं. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.





Ratnagiri News : रत्नागिरी: तब्बल चार तासानंतर अनुस्कुरा घाटात कोसळली दरड हटवण्यात यश, पहाटे पाचच्या सुमारास कोसळली होती दरड

Ratnagiri News :  तब्बल चार तासानंतर अनुस्कुरा घाटात कोसळली दरड हटवण्यात आली आहे. पहाटे पाचच्या सुमारास घाटात दरड कोसळल्याचे समोर आले होते. यावेळी मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. त्यानंतर आता जवळपास चार तासानंतर दरड हटवण्यात आली आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांपैकी अनुस्कुरा हा एक घाट आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा सरी बरसत आहेत. अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याची मागील आठ दिवसातील ही  दुसरी घटना  आहे.


 

उपराष्ट्रपतीपदासाठी जगदीप धनकड यांना उमेदवारी

भाजपने शनिवारी बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामनिर्देशित केले आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.


 


समृद्धी महामार्गाचा मुहूर्त अखेर ठरला, 15 ऑगस्टला होणार उद्घाटन

नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्ग 15 ऑगस्टला सुरु होणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. शनिवारी कुर्ल्यात मंगेश कुडाळकर यांनी आयोजित केलेल्या एका सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन दोन ते तीन वेळा लांबणीवर टाकण्यात आलं होतं.  

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार? दिपाली सय्यद यांच्या ट्विटमुळं चर्चांना उधाण

राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसात एकापेक्षा एक मोठे भूकंप होत आहेत. शिवसेनेतून बंड करत 50 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार का? असा सवाल उपस्थित होत असताना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या ट्वीटमुळं चर्चांना उधाण आलं आहे. 


 





राज्यात पावसाचा जोर कमी, अनेक ठिकाणी मोठं नुकसान

आठवडाभरात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तर अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही नुकसान झालं आहे. दरम्यान, कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्या ठिकाणी पाणी हळूहळू कमी होत आहे. त्यामुळं नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.


 





आज नीट यूजी परीक्षा, ऑफलाईन पद्धतीने होणार परीक्षा

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच NEET ची परीक्षा आज 17 जुलै रोजी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेपूर्वी NTA कडून NEET उमेदवारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. neet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या नोटीसद्वारे, NTA ने परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी पाळावयाच्या  मार्गदर्शक तत्त्वांबद्दल माहिती दिली आहे. NTA ने उमेदवारांसाठी neet.nta.nic.in वर NEET UG 2022 प्रवेशपत्र जारी केले आहे. दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांपर्यंत नीटची परीक्षा पार पडेल.  


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

वेदशास्त्र संपन्न धुंडीराजशास्त्री पाटांगणकर यांचे देहावसान, आज अंत्यसंस्कार

बीड येथील संत जनीजनार्दन यांचे तेरावे वंशज आणि थोरले पाटांगणाचे मठाधिपती  धुंडीराज देवीदासबुवा पाटांगणकर यांचे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता देहावसान झाले. यावेळी त्यांचे वय 82 वर्षाचे होते.  त्यांच्या जाण्याने एक जुन्या पिढीतील ज्ञानवंत आणि धर्मशास्त्रातील आधारवड हरवला आहे. पाटांगणकर महाराज यांच्या पार्थीवावर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता शहरातील मोंढा भागातील अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा 

समृद्धी महामार्गाचा मुहूर्त अखेर 15 ऑगस्टला

नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्ग 15 ऑगस्टला सुरु होणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. शनिवारी कुर्ल्यात मंगेश कुडाळकर यांनी आयोजित केलेल्या एका सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन दोन ते तीन वेळा लांबणीवर टाकण्यात आलं होतं.

आज आयसीएसई दहावी बोर्डाचा निकाल, येथे पाहा निकाल

आयसीएसई बोर्ड परीक्षेचा दहावीचा  निकाल आज जाहीर होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही सत्रांना समान महत्त्व देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 17 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी https://results.cisce.org/ या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकणार आहेत. 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...


समृद्धी महामार्गाचा मुहूर्त अखेर 15 ऑगस्टला
नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्ग 15 ऑगस्टला सुरु होणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. शनिवारी कुर्ल्यात मंगेश कुडाळकर यांनी आयोजित केलेल्या एका सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन दोन ते तीन वेळा लांबणीवर टाकण्यात आलं होतं.  


काँग्रेसची आजपासून दोन दिवस महत्वाची बैठक 
राष्ट्रपती निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगच्या अनुषंगाने आज काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता मुंबईत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश, एच के पाटील आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत. 


आरे कारशेडविरोधात पुन्हा पर्यावरणवाद्यांचं आंदोलन
आरेत मेट्रो कारशेड वळवण्याच्या हालचाली सुरु झाल्यानंतर पर्यावरणवादी आक्रमक झाले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील वादात उडी घेत पर्यावरणवाद्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. आज  पुन्हा पर्यावरणवादी आरे परिसरात निषेध आंदोलन करणार आहे.









 


भाजप आणि शिवसेना गटाच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची एकत्र बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील. सर्व आमदारांसोबत स्नेहभोजन होणार आहे.


नीटची आज परीक्षा
नीटची परीक्षा आज होणार आहे. एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी  घेण्यात येणार्‍या नीट परीक्षेसाठी वीस मिनिटे वेळ वाढवून दिला आहे. देशातील 547 शहरांमध्ये मराठी इंग्रजीसह 13 भाषांमध्ये ही परीक्षा होणार आहे. देशभरातील जवळपास 18लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील.  दुपारी 2 ते 5.20 दरम्यान ही परीक्षा होईल


आयसीएससी दहावीचा आज निकाल
आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर होणार आहे. सेमिस्टर एक आणि सेमिस्टर असं दोन समान महत्त्व देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी त्यांचा रोल नंबर टाकून हा निकाल पाहू शकणार आहेत. तसेच मार्कशीट डाऊनलोडही करू शकणार आहेत.


कास धरण 100 टक्के भरलं
सातारा- सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे आणि कास धरणाची उंची वाढवल्यानंतर ते पहिल्यांदाच 100 टक्के भरले असून आता या नव्याने बांधण्यात आलेल्या या कास धरणाचे पाणी आता बाहेर पडायला सुरवात झाली आहे. 


चिपळूणमध्ये जिल्हास्तरीय भातशेती नांगरणी स्पर्धा
रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील पालवण गावात जिल्हास्तरीय भातशेती नांगरणी स्पर्धा आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील अनेक बैलजोड्या उपस्थित असणार आहेत. सर्जा राजाचा शेतातील खेळ पाहण्यासाठी शेकडो शेतकरी उपस्थित राहतील. 


एनडीएची आज बैठक
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएची बैठक आज होणार आहे. दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.