Maharashtra Breaking News 03 July 2022 : राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नांदेड येथील शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर हे शिंदे गटात सामील होण्यामागे कुठली अदृश्य शक्ती होती हे माहीत नाही,पण यामागे मी मात्र नाही हे नक्की आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.तसेच माझ्या प्रमाणे अनेक आमदार खासदारांचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत त्यामुळे संबंध असणे काही गैर नाही.त्यामुळे शिवसैनिकांनी कुठल्याही प्रकारचा संशय मनात आणू नये असे मत हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड येथील निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यात व्यक्त केलंय.तर शिवसेनेतील 18 पैकी 14 खासदार भाजप च्या संपर्कात असून फुटल्याचा भाजपचा दावा पाटील यांनी फेटाळलाय.
अमरावती येथे उमेश कोल्हे आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या दुकानांमधून निघतो आणि त्याचा गळा कापून खून केला जातो ही घटना म्हणजे महाविकास आघाडीचे पाप पाप आहे असा आरोप नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांनी काही वेळापूर्वी खामगाव येथे केला आहे. येथील एका खाजगी कार्यक्रमात ते आले असता पत्रकारांची बोलत होते.
खासदार नवनीत राणा मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या घरी दाखल..
उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी नूपुर शर्मा यांची काही पोस्ट व्हायरल केल्याने त्यांची हत्या करण्यात आली..
खासदार नवनीत राणा ह्या मुंबई वरुण अमरावतीत आल्याबारोबर त्या थेट कोल्हे कुटुंबांना सांत्वन भेट देण्यासाठी पोहचल्या...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने शिक्षेसाठी समन्स बजावले आहे. 5 जुलै रोजी ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.
उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार इरफान खानला अमरावती न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याआधी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे.
नागपूरः कारमध्ये खाणे-पिणे करत आनंदाच्या भरता हवेत गोळीबार प्रकरणातील वकिलासह चार आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. अलोक अरुणकुमार शुक्ला (वय 39 रा. अशोकनगर, अकोला), दीपक विद्यासागर चौधरी (वय 45 रा. के.टी.नगर, नागपूर), कार्तिकेय नरेंद्र दशशहस्त्र (वय 31, रा. रजत संकुल, गणेशपेठ, नागपूर) अशी जामीन मिळेल्या आरोपींची नावे आहेत.
पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला आहे. असे असताना जिल्ह्यात 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी सुरवातीला पेरणी सुद्धा केली आहे. पण अपेक्षाप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी दुबारपेरणीच संकट बळीराजावर ओढवला आहे. पैठण तालुक्यात सुरवातीलाच शेतकऱ्यांकडून 58 हजार 331 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. ज्यात सोयाबीन 1 हजार 278, कापूस 58 हजार 606, तूर 10 हजार 54, मुग 1 हजार 298, उडीद 67.08, बाजरी 6 हजार 509 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मात्र आता जोरदार पाऊस न पडल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. वैजापूर तालुक्यात 60 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्यानुसार 55 हजार 366 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
पुणे : पुण्यातील धायरी भागा जवळ असलेल्या शेत तळ्यात बुडून २ तरुणांचा मृत्यू झाला आहे. सुरज शरद सातपुते (वय 14)पुष्कर गणेश दातखिंडे (वय 13) या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. धायरी परिसरात असलेल्या शेत तळ्यामधे दोन मुले पाण्यात बुडाल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच सिंहगड अग्निशमन केंद्र व पीएमआरडीए अग्निशमन केंद्र येथून दोन घटनास्थळी पोहचली . अग्निशमन दलाने या दोन्ही मुलांचे मृतदेह शेत तळ्यातून बाहेर काढले.
औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. एकीकडे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तर दुसरीकडे औरंगाबादच्या सिडको भागातील प्रियदर्शिनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा व गॅलरीतील विविध कामे करण्यासाठी 9.70 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यातील संरक्षक भिंत व पुतळ्यासाठी लागणारा चबुतरा तयार करण्याचे काम सुरू असून, पुढील कामासाठी या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
Mumbai Metro Car Shed : मुंबईतील मेट्रो कारशेड आरेतच (Aarey Colony) बनवण्याचा निर्णय नवनिर्वाचित शिंदे सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे. आज आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. पर्यावरणवादी संघटनांनी रविवारी सकाळी सर्व पर्यावरणवादी आणि संघटनांना जमण्याचं आवाहन केलं आहे. आरे वनक्षेत्रात पर्यावरणवादी संघटनांकडून आंदोलन केलं जाणार आहे. पर्यावरणवाद्यांनी शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
अमरावती : नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आता या खून प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा दोन वेळा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती अमरावती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
रायगड : अलिबाग येथील एटीएम मशीनमधून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला पकडण्यात यश आलं आहे. एटीएम मशीनचे फ्लॅप कव्हर उघडून चोरी करण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पेझारी येथील एटीएम मशिनमधून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला मॅनेजरच्या सतर्कतेमुळे चोराला पकडण्यात यश आलं. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत चित्रित झाली आहे. मॅनेजरनं शिताफीनं चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत नाहीय. गेल्या 24 तासांत देशात 16 हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेत सक्रिय रुग्णांची संख्याही एक लाखांच्या पुढे गेली आहे. देशात शनिवारी दिवसभरात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत 31 रुग्णांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या कोरोनाचे 1 लाख 11 हजार 711 सक्रिय रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत 13 हजार 929 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
बीड : अज्ञात फोन कॉल उचलू नका किंवा आपल्याला आलेला ओटीपी कुणालाही शेअर करू नका असे आवाहन पोलिसांकडून नेहमीच केले जाते. मात्र सायबर भामटे आता याच्याही पुढे गेल्याचे पाहायला मिळत आहे. कारण बीड जिल्ह्यातील गेवराई एका तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना ना कुणाचा कॉल आला, ना त्यांनी कुणाला ओटीपी शेअर केला, तरीही त्यांच्या खात्यातून भामट्याने दहा टप्प्यांत 50 हजार रुपये काढून घेतले. या घटनेनंतर आता पोलीसही चक्रावून गेले आहेत.
औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यांनतर काँग्रेसच्या अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचे समोर आले आहे. पक्षाला लागलेली गळती पाहता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामे देणाऱ्या नाराज पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक बोलावली आहे. मुंबईतील टिळक भवनात संध्याकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत पटोले नारजांशी चर्चा करून त्यांची बाजू जाणून घेणार आहे.
शिवमंदिर पाडून ताजमहाल बांधण्यात आला होता का? हा प्रश्न सध्या देशात सर्वाधिक विचारला जात आहे. एकीकडे ताजमहालला शिवमंदिर म्हणणारे वाद मांडत आहेत तर दुसरीकडे ताजमहालला समाधी म्हणणारे लोक आहेत. तर आता भारताच्या पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार, ताजमहाल मंदिराच्या जागेवर बांधला गेला नाही. ताजमहालच्या तळघरांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती नाहीत. एएसआयने एका आरटीआयच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. एएसआयने असेही सांगितले. 12 मे रोजी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनी आरटीआय दाखल केला होता.
नवीन सरकार भाजप-शिवसेना युतीचं, विधानसभा अध्यक्ष पदी राहुल नार्वेकरच विजयी होतील : सुधीर मुनगंटीवार
आज रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेवर मेगाब्लॉक (Central Railway Mega Block) घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या (Central Railway) वतीनं देण्यात आली आहे. रविवार असल्यामुळे आज धावणाऱ्या लोकलची संख्या काही प्रमाणात कमी असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT) ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे योग्य डाउन मार्गावर वळवण्यात येतील.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आरे बचावासाठी आज पर्यावरणवाद्यांचं सकाळी 11 वाजता आंदोलन
ज्यात सत्तांतर होताच मुंबईतल्या मेट्रोची कारशेड पुन्हा आरेमध्ये करण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतलाय. नव्या सरकारच्या या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांनी उद्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उद्या सकाळी 11 वाजता आरे परिसरात पर्यावरणवादी एकत्र येणार आहेत. कारशेड पुन्हा आरेमध्ये आणल्यास आम्ही पुन्हा येऊचे पोस्टर्स व्हायरल करण्यात आलेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
विधानसभा अध्यक्षांची निवड आज होणार
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आज बोलावलेल्या विधानसभेच्या दोन दिवसांच्या विशेष सत्रामध्ये अध्यक्षांची निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावाची या आधीच घोषणा झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनं राहुल नार्वेकरांना संधी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अखेर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
अधिवेशनाचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
- सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
- मंत्र्यांचा परिचय.
- नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय.
- अध्यक्षांच्या निवडीबाबत राज्यपालांचा संदेश.
- अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा.
- भाजपचे चंद्रकांत पाटील हे राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील. गिरीश महाजन अनुमोदन देतील.
- चेतन तुपे हे राजन साळवींच्या नावाचा प्रस्ताव मांडतील. संग्राम थोपटे अनुमोदन देतील.
- अध्यक्षांची निवड
शिवसेना आमदारांना व्हीप जारी
आज शिवसेना आणि बंडखोर आमदार आमनेसामने येणार आहेत. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी सुनील प्रभूंनी शिवसेना आमदारांना व्हीप जारी केलाय. हा व्हिप उद्धव गटासह शिंदे गटातील आमदारांनाही लागू आहे. मात्र, हा व्हिप आम्हाला लागू होत नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यपालांविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ताकारणामध्ये घेतलेल्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. विधानभवन परिसरातील गांधी पुतळा या ठिकाणी सकाळी 10 वाजता हे आंदोलन होणार आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. कॅप्टन यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी केल्यानंतर ही चर्चा अधिक तीव्र झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी कॅप्टन यांचे चांगले संबंध आहेत. पक्षाच्या विलीनीकरणामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते, असे बोलले जात आहे.
पुढील 48 तास कोकण आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता
आज कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. सोमवारपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, विदर्भाच्या काही भागात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात 4 आणि 5 तारखेला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भाजप राष्ट्रीय कार्यकारणीचा दुसरा दिवस
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक हैदराबादमध्ये सुरू आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादमधील जनसभेला संबोधित करणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 4.30 या वेळेत मोदी कार्यकारणीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता मोदींची सभा होणार आहे.
वारी अपडेट
ज्ञानेश्वरांची पालखी फलटणहून निघेल आणि बरडला मुक्कामी थांबणार आहे. तुकोबांची पालखी इंदापूरला मुक्कामी राहील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -