Delhi Assembly Election: लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात सामना करण्यासाठी तयार झालेली इंडिया आघाडी दिल्ली निवडणुकीत बिघडताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिल्लीतील निवडणुकीत केजरीवालांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये मतविभाजन होणार नाही, अशी अपेक्षा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी 'एबीपी'शी संवाद साधताना  व्यक्त केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत, कारण महाराष्ट्र निवडणुकीत आम आदमी पक्षाने आमचा पाठिंबा दिला होता.असे त्यांनी सांगितले. 


दिल्लीतील एकूण 70 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे निवडणुक आयोगाने सांगितले आहे. यावेळी दिल्लीत आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. दरम्यान, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मोठे पाऊल उचचले आहे. पक्षाने अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला आपला पाठिंबा जाहीर केलाय. या निर्णयामुळे काँग्रेसला धक्का बसल्याचं समजलं जात आहे. या निर्णयामुळं काँग्रेस आणि आम आदमी पक्षात मतविभागणी होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. दरम्यान, दिल्लीत मतांची विभागणी होणार नाही आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपच्या विरोधात निवडणूक लढवतील, अशी अपेक्षा अनिल देसाई यांनी व्यक्त केली. 


पृथ्वीराज चव्हाण म्हणाले..


काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केजरीवाल दिल्ली निवडणूक जिंकतील. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने आघाडी केली असती तर अधिक चांगले झाले असते, पण असे होण्याची शक्यता नाही. काँग्रेसही निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि ती लढणार आहे. आप नेत्या प्रियांका कक्कड यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानले आणि म्हटले की त्यांनी सत्य स्वीकारले. दरम्यान, अशोक गेहलोत म्हणाले की, दिल्लीमध्ये काँग्रेसचा सामना भाजपशी आहे.


समाजवादी पक्षाचाही आपला पाठिंबा


दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही आम आदमी पक्षाला (आप) पाठिंबा जाहीर केला होता. दिल्लीच्या निवडणुकीत ते आप सोबत मंच शेअर करतील आणि पक्षाला पूर्ण पाठिंबा देतील असे ते म्हणाले होते. आता 5 फेब्रुवारीला होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर 8 तारखेला काय निकाल येतात आणि कोणाच्या डोक्यावर मुकुट बसणारह हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


मी सर्व रस्ते प्रियांका गांधींच्या गालासारखे करेन; भाजप नेत्याची जीभ घसरली


 दिल्लीतील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी एका प्रचारसभेत प्रियांका गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. या वक्तव्याचा व्हिडिओ काँग्रेस नेते पवन खेडा यांनी X वर (ट्विटर)  शेअर केला आहे. रमेश बिधुरी व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत, 'लालूंनी वचन दिले होते की ते बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे बनवतील, पण ते तसे करू शकले नाहीत. मी तुम्हाला आश्वासन देतो, ज्याप्रमाणे मी ओखला आणि संगम विहारचे रस्ते बनवले, त्याचप्रमाणे मी कालकाजीतील सर्व रस्ते प्रियंका गांधींच्या गालासारखे करेन. या वक्तव्यावर पवन खेडा यांनी आक्षेप घेतला. त्यांनी लिहिले ही बदमाशी या नीच प्रवृत्तीच्या माणसाची फक्त मानसिकता दाखवत नाही, तर यांच्या मालकांचा खरा चेहरा दाखवते. भाजपच्या या नीच नेत्यांमध्ये तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्कार दिसतील.