Nagpur : आनंदाच्या भरात हवेत गोळीबार: चौघांना अटक व जामीन
पोलिसांनी रेतीने भरलेला ट्रक जप्त केला होता. पोलिसांच्या या कारवाईवर तोडगा काढत वकिल असलेल्या कडू यांनी ट्रकची सुटका करून दिली होती. ट्रकची सुटका झाल्याचा आनंद साजरा करण्याचे चौघांनी ठरविले होते.
नागपूरः कारमध्ये खाणे-पिणे करत आनंदाच्या भरता हवेत गोळीबार प्रकरणातील वकिलासह चार आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. अलोक अरुणकुमार शुक्ला (वय 39 रा. अशोकनगर, अकोला), दीपक विद्यासागर चौधरी (वय 45 रा. के.टी.नगर, नागपूर), कार्तिकेय नरेंद्र दशशहस्त्र (वय 31, रा. रजत संकुल, गणेशपेठ, नागपूर) अशी जामीन मिळेल्या आरोपींची नावे आहेत.
एका प्रकरणात पोलिस कारवाईपासून वाचल्यानंतर एका वकिलासहर चौघे गिट्टीखदान परिसरात रस्त्याच्या कडेला कार उभीर करून गाण्यावर नाचत होते. त्यातील एकाने आनंदाच्या भरात जवळ असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून दोन राऊंड हवेत फायर केले. परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सूचना मिळताच पोलिसांनी पाठलाग करून कारने पळण्याच्या बेतात असलेल्या चौघांना अटक केली. उत्कर्षनगर टर्निंग, ग्रीन व्हीव अपार्टमेंट समोर रात्री 10.30 ते 1.30च्या दरम्यान घडली.
अलोक आणि कार्तिकेय यांचा रेती ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी मौदा पोलिसांनी आलोकचा रेतीने भरलेला ट्रक जप्त केला होता. कार्तिकेयने उच्च न्यायालयात वकिली करीत असलेले राजून कडू यांच्याशी आलोकची ओळख करून दिली. पोलिसांच्या कारवाईवर तोडगा काढत कडू यांनी आलोकच्या ट्रकची सुटका करून दिली. ट्रकची सुटका झाल्याचा आनंद साजरा करण्याचे ठरविले. त्यामुळे चौघेही आलोकच्या कारने कळमेश्वर मार्गावरील ढाब्यावर जात होते. दरम्यान, कारमध्ये त्यांचे खाणेपिणेही सुरूच होते.
आलोकच्या कारमध्ये परवाना असलेले त्याचे रिव्हॉल्वरही होते. चौघेही उत्कर्षनगर चौकात आल्यावर त्यांनी कार तिथे उभी केली आणि नाच-गाणे सुरू केले. अतिउत्साहात आलोकने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या हवेत झाडल्या. गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली.
पाठलाग करुन अडविली कार
पोलिसांना माहिती मिळताच संपूर्ण परिसरात सापळा रचून नाकाबंदी केली. दरम्यान काळ्या रंगाची व विशिष्ट क्रमांक असलेली काळ्या रंगाची एसयूव्ही कार हजारीपहाड येथे येताना दिसली. पाठलाग करून गाडी थांबवण्यात आली. चारही आरोपी कारमध्ये होते. गोळीबारात वापरलेले रिव्हॉल्व्हरही झडतीत सापडले. चौघांना अटक करून रिव्हॉल्व्हर आणि कार जप्त करण्यात आले होते.























