(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: महाविकास आघाडी सरकार कोसळताच बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याची निविदा प्रसिद्ध
Balasaheb Thackeray Statue: निधी कमी पडत असल्याने पुन्हा 9.70 कोटींचा अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.
Aurangabad News: एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. एकीकडे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तर दुसरीकडे औरंगाबादच्या सिडको भागातील प्रियदर्शिनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा व गॅलरीतील विविध कामे करण्यासाठी 9.70 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यातील संरक्षक भिंत व पुतळ्यासाठी लागणारा चबुतरा तयार करण्याचे काम सुरू असून, पुढील कामासाठी या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
असा असणार बाळासाहेबांचा पुतळा...
पहिल्या टप्प्यातील बाळासाहेबांच्या पुतळ्या परिसरातील अंतर्गत रस्ते व इतर सिव्हिलची काम पूर्ण होत आहेत. शिवसेनाप्रमुखांचा 51 फूट उंचीचा भव्य पूर्णाकृती पुतळा नवीन तंत्रज्ञानावर आधारित जीआरएसमध्ये बनवला जाणार आहे. ज्यात आर्ट गॅलरी, साउंड सिस्टीम, चित्रफीत, इंटेरियर सुशोभीकरण, लाइट सिस्टीम असणार आहे. औरंगाबाद शहर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तसेच बाळासाहेबांचं औरंगाबाद जिल्ह्यावर विशेष प्रेम होते. त्यामुळे शहरात होणाऱ्या त्यांच्या पुतळ्याचेही विशेष महत्व आहे.
सरकारकडून अतिरिक्त निधी...
बाळासाहेबांचे स्मारक व स्मृतिवन विकसित करण्यासाठी राज्य शासनाने 25.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र हा निधी कमी पडत असल्याने पुन्हा 9.70 कोटींचा अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर ही कामे करण्यासाठीची निविदा 1 जुलैला प्रसिद्ध करण्यात आली आहे. 25 जुलै निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख असून, 28 जुलैला निविद उघडली जाणार आहे. तर 15 जुलैल निविदा भरण्यासाठी इच्छुक असलेल्या कंत्राटदारांची प्रि-बिड बैठक होणार आहे.
बाळासाहेबांचा पहिला पुतळा मुंबईत...
औरंगाबाद येथे बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पुतळा उभारला जात असला तरीही, बाळासाहेबांचा पहिला भव्य पुतळा मुंबईतील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेला हा बाळासाहेबांचा पहिला भव्य पुतळा आहे. या पुळ्याची उंची नऊ फूट असून, 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे.