(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Loksabha Election : कुठे पत्नी, कुठे सून, कुठे मुलगी- मुलाला तिकीट, लोकसभा निवडणुकीत सगे सोयऱ्यांची व्यवस्थित सोय!
Maharashtra Loksabha Election : महाराष्ट्रामध्ये घराणेशाहीत तिकीट देण्यामध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असून शिंदे आणि काँग्रेस संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
Maharashtra Loksabha Election : ज्या घराणेशाहीवरून पीएम मोदी, अमित शाह यांच्याकडून देशव्यापी प्रचार केला जातो, त्याच घराणेशाहीला शरण जाण्याची वेळ महाराष्ट्रामध्ये आली आहे का? अशीच शंका उपस्थित होत आहे. महाराष्ट्रामध्ये घराणेशाहीत तिकीट देण्यामध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असून शिंदे आणि काँग्रेस संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे घराणेशाहीचा विरोध करता करता घराणेशाहीलाच आता तिकिटे देण्याची वेळ राजकीय पक्षांकडे आली आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.
घराणेशाहीचा मुद्दा बोथट झाला आहे का?
घराण्यातील लोकांना स्वीकारणार की नाकारणार? याचं उत्तर चार जून रोजी होणाऱ्या निकाला दिवशी मिळणार आहे. भाजपकडून आतापर्यंत पंकजा मुंडे, डॉ. भारती पवार, डॉ. हिना गावित, नवनीत राणा, पियुष गोयल, रक्षा खडसे, अनुप धोत्रे डॉक्टर सुजय विखे पाटील, स्मिता वाघ या घराणेशाहीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या उमेदवारांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. राज्यातील सर्वाधिक घराणेशाहीमधूनच तिकिट भाजपकडून देण्यात आली आहेत.महाराष्ट्रामधील 9 उमेदवार हे घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करणारे आहेत.
पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असून पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. भारती पवार या माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या सूनबाई आहेत. हिना गावित या राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. नवनीत राणा या आमदार रवी राणांच्या पत्नी आहेत. पियुष गोयल यांचे वडील वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. आई तीनवेळा आमदार राहिल्या आहेत. रक्षा खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आहेत. अनुप धोत्रे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र आहेत. डॉ. सुजय विखे पाटील हे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आहेत. त्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा बोथट झाला आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो.
सर्वांकडे घराणेशाहीतील उमेदवार
दुसरीकडे अजित पवार गटाकडून सुद्धा अर्चना पाटील, सुनेत्रा पवार यांना सुद्धा घराणेशाहीमधून तिकीट देण्यात आलं आहे. अर्चना पाटील उस्मानाबादचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत, तर माजी मंत्री पद्मश्री पाटील यांच्या सुनबाई आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या पत्नी आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना सुद्धा तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं असून त्या शरद पवार यांच्या कन्या आहेत. त्यामुळे इथं सुद्धा घराणेशाही स्पष्ट होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.
दुसरीकडे, काँग्रेसने सुद्धा घराणेशाहीमध्येच प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रणिती शिंदे, डॉ. प्रशांत पडोळे, प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रणिती शिंदे सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. त्या दोनदा आमदार राहिल्या असून आता लोकसभेला सामोरे जात आहेत. प्रशांत पडोळे दिवंगत आमदार यादवराव पडोळे यांचे ते पुत्र आहेत, तर प्रतिभा धानोरकर या माजी खासदार दिवंगत बाळू धानोरे यांच्या पत्नी आहेत.
शिवसेना शिंदे गटांकडून श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंवर सातत्याने टीका केली जाते. मात्र, श्रीकांत शिंदेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हिंगोलीतून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. धैर्यशील माने यांना सुद्धा हातकणंगलेतून तिकिट देण्यात आलं आहे. त्यांच्या मातोश्री निवेदिता माने, आजोबा बाळासाहेब माने हे सुद्धा खासदार राहिले आहेत. कोल्हापुरातून संजय मंडलिक हे सुद्धा घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करतात. सदाशिवराव मंडलिक यांचे ते चिरंजीव आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या