Maharashtra Lockdown, Vaccination, Corona Update LIVE : पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश संवेदनशील आपत्तीचे ठिकाण
Maharashtra corona vaccination lockdown updates : लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात, लसीचा साठाच नसल्याने अनेक राज्यांची लसीकरण करण्यास असमर्थता दर्शवली आहे. कोरोना, लसीकरण आणि लॉकडाऊनसंदर्भातील सर्व अपडेट्स या लाईव्ह अपडेटमध्ये....
Background
देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा नवा विक्रम, एकाच दिवसात चार लाख नव्या रुग्णांची भर तर 3523 जणांचा मृत्यू
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता रुग्ण संख्येची त्सुनामी येत असल्याचं दिसून येतंय. गेल्या 24 तासात देशात 4,01, 993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी देशात जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्या आधी गुरुवारी देशात 3.86 लाख रुग्णांची भर पडली होती. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगभरातील एकाच दिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्येपैकी 40 टक्के रुग्णसंख्या ही एकट्या भारतात वाढत असल्याचं समोर आलं आहे.
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात, लसीचा साठाच नसल्याने अनेक राज्यांची लसीकरण करण्यास असमर्थता
देशातील कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 18 ते 45 वर्षामधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचे रजिस्ट्रेशन 28 एप्रिलपासून सुरू झालं असून आतापर्यंत 80 लाखांहून अधिक लोकांनी आपल्या नावाची नोंद केली आहे. असं असलं तरी या देशभर राबवण्यात येणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या कार्यक्रमासमोर काही अडचणी आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगालसहित देशातील 11 राज्यांमध्ये आजपासून या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करता येणं शक्य नसल्याचं त्या राज्यातील सरकारांनी स्पष्ट केलं आहे. लसींची असलेली कमतरता हे यामागचे कारण सांगण्यात येतंय.
अनाथ मुलांना आता 18 ऐवजी 23 वर्षे पूर्ण होईपर्यंत अनाथ आश्रमात राहता येणार, मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा
राज्यभरातील 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनाथाश्रमातून बाहेर पडणाऱ्या मुलांची व्यथा 'एबीपी माझा'ने दाखवल्यानंतर आता राज्यभरातून मदतीचा ओघ या मुलांसाठी सुरू झाला आहे. एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनुरक्षण गृहांमध्ये पात्र मुलांना अनुरक्षण सेवा पुरविण्यासाठी वयाची अट दोन वर्षांनी शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या बालकांना अनुरक्षण गृहांमध्ये अधिकची दोन वर्षे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, प्रशिक्षण आदी सुविधा मिळणार आहेत.
पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश संवेदनशील आपत्तीचे ठिकाण
इतर ठिकाणाहून राज्यात होणारा कोविड-१९ चा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि राज्य मध्ये त्याच्या अंकुश लावण्यासाठी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांना संवेदनशील आपत्तीचे ठिकाण घोषित करण्यात आले आहे.
राज्य सरकार तर्फे जारी एका आदेशात सदर माहिती देण्यात आली असून १८ एप्रिल २०२१ रोजी जाहीर केलेल्या आदेशात असलेल्या ठिकाणांना व्यतिरिक्त हे दोन ठिकाण त्यात सामील असतील. सदर आदेश निघाल्यापासून जोपर्यंत सदर आदेश परत घेतला जात नाही किंवा कोविड-१९ आपत्ती म्हणून अधिसूचित राहते तोपर्यंत हे दोन्ही ठिकाण संवेदनशील उत्पत्ती चे ठिकाण म्हणून ग्राह्य धरण्यात येतील. संवेदनशील ठिकाणांसाठी आतापर्यंत निघालेल्या पत्रकांत यांच्या माध्यमातून ज्या ज्या स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एस ओ पी) घोषित करण्यात आले आहेत ते सर्व एस ओ पी या दोन ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असेल.























