(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur North By Election Results 2022 : जयश्री जाधव कोल्हापूर उत्तरमधील पहिल्या महिला आमदार, सत्यजीत कदम यांचा पराभव
Kolhapur North By Election Results 2022 : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.
कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा 18,901 मतांनी विजय झाला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं.
एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला.
काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती.
यानिवडणुकीत काँग्रेससह भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली ताकद पणाला लावली होती. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अनेक दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडलं होतं. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही इथे प्रचार केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या प्रचारामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा गेल्या तीन निवडणुकीतील आढावा
- 2009 साली छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव करुन शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे पहिल्यांदा आमदार बनले
- राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा 3687 मतांनी पराभव केला
- 2014 साली पुन्हा राजेश क्षीरसागर हे 22421 मताधिक्य घेऊन दुसऱ्यांना आमदार झाले
- त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर होते
- तर 2019 साली राजेश क्षीरसागर यांचा 15199 मतांनी पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार बनले होते
संबंधित बातम्या