(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Karnataka Border Dispute : सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राची बाजू भक्कम, राम मंदिरसारखाच सीमावादाचाही निकाल लागेल : सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पंडित नेहरूंची चूक असून राज्य सरकार आपली बाजू भक्कमपणे सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहे. तसेच आपण जिंकू असा आशावाद मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
Nagpur News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद म्हणजे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या चुकीचा परिणाम आहे. त्यानंतरच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून कर्नाटकच्या सीमेवरील मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात यावं अशी मागणी सुरु झाली असल्याची टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. ते एबीपी माझाशी बोलत होते.
पुढे मुनगंटीवार म्हणाले, सीमावादाचा प्रश्न हा न्यायालयातूनच सुटणार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) आपल्याला आपली बाजू मांडावीच लागेल. हा सीमावादाचा न्यायालयाच्या बाहेर सुटण्याचा प्रश्न नाही. सीमाभागातील गावात मराठी भाषिकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून त्याचा दुसरा संदर्भ नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
सीमावादाच्या प्रकरणात महाराष्ट्र जिंकेल
कर्नाटकला वाटतंय की त्यांची बाजू मजबूत आहे. मात्र महाराष्ट्राला वाटते की, आमची भूमिका जास्त मजबूत आहे. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जिंकू. अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या प्रकरणातही काँग्रेस (Congress) आणि काही विरोधक म्हणत होते की रामाची काल्पनिक कथा आहे. मात्र आम्हाला वाटायचं की हा विश्वासाचा, आस्थेचा अस्मितेचा मुद्दा आहे, आणि आम्ही जिंकलो. तसंच सीमावादाच्या प्रकरणातही महाराष्ट्र जिंकेल असा विश्वासही यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
विरोधकांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या टीकांवर मुनगंटीवार म्हणाले, जर कर्नाटकाच्या आगामी निवडणुकीला अनुसरुन सीमावादाचा मुद्दा तापत असेल. तर काँग्रेसचे कर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष का म्हणत नाही की यामुळे भाजपला फायदा होत आहे. म्हणून सीमावाद असलेली गाव महाराष्ट्राला देऊन टाकावे आहे. सीमावादाचा निवडणूक जिंकण्याशी काही संबंध नाही. आता राजकारणात शिक्षणाची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
'सीमाप्रश्न सोडवण्यासाठी आधीच्या सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत'
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आधीच्या सरकारने सीमावादाचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नसून त्यांनी कोर्टात दिलेले प्रतिज्ञापत्र आश्चर्यजनक आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना सीमावाद सोडवण्यासाठी काय प्रयत्न झाले. शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना वकिलांच्या किती बैठका घेतल्या. हे सर्व तथ्य समोर आले तर तुम्ही लोकांच्या नजरेतून उतरुन जाल, असा टोलाही लागावला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पंडित नेहरुंची चूक असून सर्वोच्च न्यायालयात लक्षात आणून देऊ, तसेच महाराष्ट्रातील राज्य सरकार कर्नाटकमधलं बंगळुरु मागत नाही. मराठी भाषिक गाव मागत आहोत. तसेच सर्वोच्च न्यायालयात नक्कीच महाराष्ट्र सरकार जिंकणार असा आशावादही यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
ही बातमी देखील वाचा