Fake Tweet: सीमावादाचा वणवा ट्विटरच्या टिवटिवीनंच पेटला? त्या फेक ट्वीटचा घोळ नेमका आहे तरी काय?
Maharashtra Karnataka Border Dispute: बुधवारी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती.
मुंबई: ट्विटर या बहुचर्चित सोशल माध्यमाचं चिन्ह आहे एक चिमणी...अनेकदा ट्विटरवरच्या वादविवादाला टिवटिव असाही शब्दप्रयोग वापरला जातो. पण सध्या याच चिमणीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा वणवा (Maharashtra Karnataka Border Dispute) पेटवल्याचा आरोप केला जातोय. जो काही तणाव वाढला तो ट्विटरवरुन वाढल्याचं स्पष्ट झालंय. पण तणाव वाढवणारं ते ट्वीट नेमकं कोणतं आहे, आणि ते कोण केलंय याची स्पष्टता नाही.
सीमावादावर काल दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांनी आमने सामने बसवलं. काही उपायही सुचवले. पण या बैठकीनंतर या तणावाचं खापर सर्वाधिक कुठल्या गोष्टीवर फुटलं असेल तर ते एका ट्विटरवर. म्हणजे सीमावादाचा हा वणवा पेटला टिव टिव करणाऱ्या एका चिमणीमुळे. बाकी राजकारण्यांचा जणू त्यात काही दोष नाही, पण मुळात ज्या ट्वीटवरुन हा वाद सुरु झाला ते ट्वीट नेमकं काय आणि कुणाचं होतं याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.
सांगलीतील जतमधील गावांविषयी बोलताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काही वक्तव्यं केली. त्यानंतर त्याला उत्तरं देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वक्तव्य केलं. नंतर त्यावर दोन्ही बाजूकडील राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया सुरू झाल्या आणि हा तणाव वाढला.
सीमाप्रश्न तापल्यानंतर महाविकास आघाडीचे खासदार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. त्यावर अवघ्या काही तासात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं दुसरं ट्विट केलं. त्यातून त्यांनी सीमापरिसरावर कर्नाटकचाच दावा असल्याचं सांगितलं.
पण सीमावादात ज्या ट्वीटमुळे तणाव वाढला ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं आहे की आणखी कुणाचं आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही. त्यामुळे या प्रश्नी गोंधळात आणखी भर पडली
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या ज्या ट्विटमध्ये आक्रमक भाषा दिसली, महाराष्ट्राच्या खासदारांच्या मीटिंगची खिल्ली उडवली गेली ते ट्वीट अजूनही हटवले गेलेले नाही. बी एस बोम्मई या नावानं ब्लू टिक असलेल्या व्हेरिफाईड हँडलवरच हे ट्वूट अजूनही कायम आहे. त्यामुळे फेक ट्विटचा हा आरोप नेमका कुणावर आहे यावर अद्याप काहीच स्पष्टता नाही.
कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या कालच्या बैठकीत दोन्ही बाजूंनी फेक ट्वीटमुळे तणाव वाढला असा निष्कर्ष काढला गेला. वरिष्ठ नेत्यांच्या नावानं ट्वीट व्हायरल केले गेले असतील तर मग त्यावर तातडीनं कारवाई कधी होणार आणि मुळात ते ट्वीट डिलीट म्हणजे किमान मागे कधी घेतले जाणार हाही प्रश्न आहे.