(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्र गुजरात सीमा वाद उफाळला, वेवजी ग्रामपंचायत हद्दीत सोलसुंभा ग्रामपंचायतीचे अतिक्रमण
गुजरात आणि महाराष्ट्र् राज्याच्या या सीमेवरील हद्द निश्चित नसल्याने हद्दीवरुन वेवजी आणि सोलसुंभा या दोन ग्रामपंचायतीमधील रहिवाशांमध्ये अतिक्रमणाचे तंटे निर्माण होतात.
पालघर : महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील वेवजी ग्रामपंचायतीच्या राज्यमार्गावर गुजरात राज्यातील सोलसुंभा ग्रामपंचायतीने विजेचे पोल उभारुन महाराष्ट्राच्या हद्दीत अतिक्रमण केल्याने वेवजी ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ग्रामस्थांकडून अतिक्रमणाबाबत तक्रारी आल्यानंतर वेवजी ग्रामपंचायतीने गुजरात राज्यातील सोलसुंभा ग्रामपंचायतीला वीजेचे पोल काढून नेण्यास कळवले असतानाही सोलसुंभा ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्यातील वीजेचे पोल काढत नसल्याने सीमेवरील हद्द हा वादाचा विषय बनला आहे. गुजरात आणि महाराष्ट्र दोन राज्यांच्या सिमा सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक ग्रामपंचायत, भुमी अभिलेख आणि महसूल खात्याच्या परवानगीने निश्चित कराव्यात ही मागणी जोर धरत आहे. वारंवार वाद दूर करण्यासाठी दोन राज्याचा सीमेचा वाद सर्वाच्च न्यायालयात जाण्याची तयारी आल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक धोडी यांनी बोलताना सांगितले
महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर वेवजी ग्रामपंचायत आहे. वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नं 204 चा भुखंड आणि सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नंबर. 173 या दोन भुखंडावर दोन राज्यांची सीमा आहे. वेवजी सीमेवर महाराष्ट्राची हद्द सांगणार्या फलकासमोरच गुजरात राज्याच्या इमारती उभ्या राहात आहेत. गुजरात आणि महाराष्ट्र् राज्याच्या या सीमेवरील हद्द निश्चित नसल्याने हद्दीवरुन वेवजी आणि सोलसुंभा या दोन ग्रामपंचायतीमधील रहिवाशांमध्ये अतिक्रमणाचे तंटे निर्माण होतात. गुजरात राज्याच्या सीमेवर महाराष्ट्र सीमेचा हद्द सांगणारा दिशादर्शक चिराही तोडण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले.
काय आहे हा वाद ?
तलासरी- उंबरगाव राज्यमार्गावर गुजरातच्या सर्वे नं. 173 चा 300 मिटरचा त्रिकोणी आकाराचा भुखंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याला जोडला आहे. त्यानंतर 300 मीटर नंतर हा रस्ता पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सर्वे नं 204 ला जोडतो. मात्र या दोन्ही राज्यांनी हद्द कायम केलेली नाही. परिणामी या त्रिकोणी कोपऱ्याचा अधार घेऊन महाराष्ट्र सीमेत 1500 मीटर गुजरात राज्याचे अतिक्रमण झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या सोलसुंबा ग्रामपंचायतीने शैक्षणिक सोईचे कारण सांगून वेवजी ग्रामपंचायतीला पत्र देऊन स्ट्रीट लाईटचे खांब टाकण्यात आले. मात्र ही स्ट्रीट लाईट गुजरातच्या इंडिया कॉलनीच्या रहिवाशांसाठी करण्यात आली असल्याचे लक्षात आल्यानंतर वेवजी ग्रामपंचायतीने सोळसुंभा ग्रामपंचायतीला महाराष्ट्राच्या हद्दीत उभारलेले वीजेचे खांब काढून नेण्याबाबत पत्राद्वारे खडसावून कळवले आहे. तसा ग्रामपंचायतीने ठरावही घेतला आहे. दरम्यान सोळसुंभा ग्रामपंचायतीने वेवजी ग्रामपंचायतीच्या पत्राला केराची टोपली दाखवत अतिक्रमण कायम ठेवले आहे. जागा आपली असल्याचा दावा सोलसुंभाचे रहिवासी करीत आहेत.
दिनांक 15/06/2017 रोजी वेवजी ग्रामपंचायतीने सोलसुंभा ग्रामपंचयातीला हद्दीचे दस्तावेज सादर करण्याचे आदेश देऊनही त्याची पुर्तता न करता वेवजी ग्रामपंचायत हद्दीत आतिक्रमणे वाढ झाली आहे. दरम्यान स्ट्रीट लाईट बसवलेल्या जागेची कागदपत्र तसेच लेखी स्वरूपात सादर न केल्यास स्ट्रीट लाईट अतिक्रमण आहे असे समजून काढण्यात येईल असे वेवजी ग्रामपंचायतीने कळवले होते. मात्र आज पावेतो सोलसुंभा ग्रामपंचायतीने विजेचे पोल काढले नसल्याने हद्दीचा वाद वाढत आहे. याचा स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे. वेवजीहून उंबरगाव रेल्वे स्थानक आणि उंबरगाव जिआयडीसी मुळे या भागात रहिवासी वसाहतीसाठी जागेला महत्व आले आहे.
उप अभियंता तलासरी राजेंद्र चव्हाण म्हणाले, " दहा वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचा चिरा 100 मीटर पुढे होता. मात्र तो चिरा दिसत नाही. आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विरोध केला आहे. दोन्ही राज्यांच्या भूमिअभिलेख नकाशे, महसूल खाते, यांच्या परवानगीने सीमेची हद्द निश्चित करावी लागेल. त्यासाठी वेवजी आणि सोलसुंभा दोन्ही सिमेवरील नकाशे मागवून त्याचा तोडगा काढावा लागेल. महाराष्ट्र हद्दीतील राज्यमार्गाची डागडुजी आपण करतो."
वेवजी रहिवासी अशोक रमण धोडी म्हणाले, "दोन राज्यांचा वाद असल्याने कोणीही यामध्ये भाग घेत नाही. त्यामुळे रहिवाशांना वादाला तोंड द्यावे लागते. महाराष्ट्राच्या जागेत गुजरातला अतिक्रमण करु देणार नाही. आपण त्यासाठी दोन्ही राज्यांच्या जिल्हाधिकारींना पत्रव्यवहार केला आहे. बलसाड महसूल अधिकारी त्या जागेचे कागदपत्र सादर करु शकले नाहीत. सीमावाद असल्याने तोडगा निघत नसल्याने सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत."
वेवजी ग्रामपंचायत कडून सोलसुम्भा ग्रामपंचायतला देण्यात आलेली परवानगी रद्द केल्याची माहिती व शासनास हे सीमांकन करण्याची पत्र देण्यात आली असून पुढील पाठपुरावा सुरू असल्याचे वेवजी ग्रामविकास अधिकारी मंगेश पाटील यांनी सांगितले आहे.
तहसीलदार तलासरी स्वाती घोंगडे म्हणाल्या, ह्या विषयी भूमी अभिलेख यांच्या मार्फत दोन्ही राज्यांचे सीमांकन निश्चित करावे लागणार असून,पालघर आणि वलसाड जिल्हाधिकारी यांच्या यांच्या संगनमताने हा विषय मार्गी लावावा लागेल तसा पत्रव्यवहार वरिष्ठ पातळीवर करण्यात येत आहे.