(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आनंदाचा शिधा वाटपाला उशीर होण्याची शक्यता; गुढीपाडवा चार दिवसांवर, शिधा अद्याप स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचलाच नाही
Anandacha Shidha गुढीपाडवा तोंडावर आला आहे अद्याप आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहचलेला नाही.
Anandacha Shidha : गुढीपाडव्याच्या (Gudhipadwa) मुहूर्तावर सर्वच गोरगरिबांना आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) मिळणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याचं कारण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या शिधावाटपाला उशीर होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावरुन प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांची आकडेवारी घेण्यात आली आहे. मात्र अजून पुढे काहीही हालचाल न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण गुढीपाडवा आता फक्त पाच दिवसांवर आला आहे, त्यातही एक रविवार आहे. यामुळेच चार दिवसात ट्रकमध्ये माल भरणार कधी? तो प्रत्येक जिल्ह्यातील रेशन दुकानांवर पोहोचणार कधी? आणि वाटपाला सुरुवात होणार कधी? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
संपामुळेही शिधा वाटप प्रक्रियेला उशीर?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळेही शिधा वाटप प्रक्रियेला उशीर होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावरुन प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांची आकडेवारी घेण्यात आली आहे मात्र अजून पुढे काहीही हालचाल न झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दिवाळीत अनेक लाभार्थ्यांना दिवाळी उलटून गेल्यानंतर देखील शिधा मिळाला नव्हता. आता गुढीपाडवा तोंडावर आला आहे. अद्याप आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचलेला नाही. एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात 7 लाख 93 हजार 591 लाभार्थी आहेत.
राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्यात येणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चनाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल मिळणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा
आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ई-पासद्वारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पासची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल. हा आनंदाचा शिधा देण्याकरता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधा जिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार, 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.