Maharashtra Grampanchayat Election: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा आजपासून 'धुरळा'! सात हजारहून अधिक गावगाड्यात रणधुमाळी
Election News: प्रत्यक्ष राजकीय पक्षाच्या चिन्हावरती या निवडणुका होत नसल्या तरी स्थानिक नेत्यांसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीच्या रिंगणात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
Maharashtra Grampanchayat Election: राज्यामध्ये शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) आणि भाजपा (BJP) एकत्रित येऊन सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जात आहेत. थेट जनतेतून सरपंच पद निवडले जात असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढण्यासाठी उमेदवारांमध्ये उत्साह कमी जाणवत असला तरी मोठ्या राजकीय पक्षाचे नेते सुद्धा या निवडणुकीमध्ये ताकत लावताना पाहायला मिळत आहेत.
राज्यामध्ये आजपासून सुरू झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतीची निवडणूक ही बीड जिल्ह्यातील असणार आहे. बीड जिल्ह्यात सातशे चार ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि काका जयदत्त क्षीरसागर यांचे मूळ गाव असलेल्या नवगणराजुरीमध्ये सुद्धा या चुलत्या पुतण्यामध्ये संघर्ष पाहायला मिळतय तर पंकजा आणि धनंजय मुंडे यांचे मूळ गाव असलेल्या नाथऱ्या मध्ये ही ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय..
असा असेल निवडणूक कार्यक्रम
28 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात..
2 डिसेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत..
5 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे..
7 डिसेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे..
18 डिसेंबर रोजी मतदान आणि 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे..
राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला आजपासून सुरुवात झालीय. प्रत्यक्ष राजकीय पक्षाच्या चिन्हावरती या निवडणुका होत नसल्या तरी स्थानिक नेत्यांसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीच्या रिंगणात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोप्या जाव्यात यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत..
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरमध्ये ग्रामपंचायत निवडणूक मोठी प्रतिष्ठेची झाली आहे तर सारोळा बुद्रूक या गावची निवडणूक देखील होत आहे. उस्मानाबाद तालुक्यातील 167 ग्रामपंचायतीपैकी ही महत्त्वाची ठरेल. उध्दव ठाकरे गटाकडे राहिलेले आमदार कैलास पाटील यांचे हे गाव आहे. कैलास पाटील आमदार होण्याआधी या गावचे सरपंच होते. नांदेडच्या लोहा तालुक्यातील मानसपुरी, उमरज,लोहरा ह्या मोठ्या ग्रामपंचायत असून याठिकाणी खासदार प्रताप पाटील यांचा स्थानिक तालुका असून यात शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदे व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात प्रमुख लढत असणार आहे.
राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींच्या निवडणुका
अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.
राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्ये थेट राजकीय पक्ष जरी मैदानात उतरत नसले तरी प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावत असतात. म्हणून राज्यातील महानगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.