राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विधानभवनवर आक्रोश मोर्चा, काय आहेत मागण्या?
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजुर करावी यासह अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढणार आहेत.
ठाणे : महाराष्ट्रातील 27 हजार 920 ग्रामपंचायती मधील 60 हजार कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने शुक्रवार, 28 जून रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. कर्मचारी युनियनचे प्रदेशाध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांनी भिवंडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
काय आहे कर्मचारी संघटनेच्या मागण्या? (Demands Of Maharashtra Gram Panchayat Employee)
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजुर करावी.
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे.
- किमान वेतनाच्या अनुदानाची 19 महिन्यांची थकीत रक्कम तात्काळ मिळावी.
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत असलेली वसुलीची अट रद्द करावी. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी.
- ग्रामपंचायत कर्मचारी दहा टक्के आरक्षणानुसार भरती करत असताना दरवर्षीच्या रिक्त पदावर अनुकंपाचे धरतीवर करावी.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्या या अद्याप प्रलंबित आहेत.युनियनच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी केलेल्या आंदोलन प्रसंगी शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही.सरकारने आजपर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, त्यासाठी या आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे असं संघटनेचं म्हणणं आहे.
यानंतरही आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आंदोलन अधिक उग्र करीत मुंबई येथे आमरण उपोषण सुरू करून राज्यातील ग्रामपंचायती कर्मचारी बेमुदत संप पुकारतील असा इशारा दत्तात्रय भोईर यांनी दिला आहे.
ही बातमी वाचा: