(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात 30 जूनपर्यत कुठलीही प्रशासकीय बदली होणार नाही ; राज्य सरकारचा निर्णय
maharashtra government : राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षापासून रखडलेल्या सार्वत्रिक बदल्या आता आणखी एक महिना लांबणीवर पडणार आहेत.
मुंबई : राज्यात 30 जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने (maharashtra government) घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता 30 जून पर्यंत प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीची बदली होणार नाही. परंतु, तातडीची बदली असल्यास मुख्यमंत्र्याच्या मान्यतेने अशी बदली करता येणार आहे. राज्य शासनाकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
''महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे निनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार करण्यात येणाऱ्या बदल्या 2022-23 या चालू आर्थिक वर्षी 30 जून 2022 पर्यंत करण्यात येऊ नयेत. परंतु, पआशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास अशी बदली मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने करावी, असे शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षापासून रखडलेल्या सार्वत्रिक बदल्या आता आणखी एक महिना लांबणीवर पडणार आहेत. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सार्वत्रिक बदल्या आणखी एक महिना पुढे ढकलण्याची मागणी केली होती, अशी मागणी सूत्रांकडून मिळाली आहे.
दरवर्षी मे महिन्यात राज्य सरकारच्या अनेक प्रशासकीय विभागांमधील बदल्या होत असतात. परंतु, गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोरोना महामारीमुळे या बदल्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे 31 मे पर्यंत या बदल्या होतील अशी शक्यता होती. परंतु, या वर्षी मे मध्ये या बदल्या न होता त्या 30 जून नंतरच होतील.
दरम्यान, कोरोना माहामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बदली न झालेले अनेक कर्मचारी बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु, या कर्मचाऱ्यांना आता आणखी एक महिना बदलीसाठी वाट पाहावी लागणार आहे. 30 जून नंतर तरी हव्या असलेल्या ठिकाणी होणार का? याकडे बदलीसाठी अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या