ITI Student Stipend: आयटीआय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 40 रुपयांऐवजी 500 रुपये विद्यावेतन मिळणार
ITI Student Stipend: राज्यातील शासकीय आयटीआय संस्थेतील विद्यार्थ्यांना आता 500 रुपये विद्यावेतन मिळण्याची शक्यता आहे.
ITI Student Stipend: राज्यातील हजारो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. शासकीय आयटीआय संस्थांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा विद्यावेतनात (ITI Student Stipend) घसघसीत वाढ होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना 40 रुपये विद्यावेतन देण्यात येत होते. आता, त्यात वाढ होणार असून 500 रुपयांचे विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी विधान परिषदेत दिली.
आज विधानसभेत आमदार विक्रम काळे, डॉ. सुधीर तांबे, सतिश चव्हाण, बाळाराम पाटील यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून दरमहा 40 रुपये विद्यावेतन देण्यात येत होते. वाढत्या महागाईच्या काळात हे विद्यावेतन अतिशय कमी आहे, असा मुद्या आमदारांनी उपस्थित केला. सरकारकडून या विद्यावेतनात वाढ करण्यात येणार का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता.
त्यावर उत्तर देताना, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर देताना विद्यावेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांसाठी असलेले विद्यावेतन हे 40 रुपयांवरून 500 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. संबंधित प्रस्ताव हा मंत्रीमंडळासमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.
आयटीआय कोर्सेसमध्ये बदल होणार
आयटीआयमधील कोर्सेस हे कालबाह्य झाले असून नवीन कोर्सेस बाबत सरकार पुढील वर्षी घोषणा करणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. राज्यातील 36 जिल्ह्यासाठी एक कमिटी स्थापन केली असून प्रत्येक जिल्ह्यात ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी आवश्यक असणारे कोर्स घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
IIT अभ्यासक्रमाची उद्दिष्ट्ये काय?
उद्योगासाठी वेगवेगळ्या व्यवसायातील कुशल कामगारांचे नियमित प्रवाह सुनिश्चित करणे. कामगारांच्या पद्धतशीर प्रशिक्षणाने कामगारांची गुणवत्ता आणि औद्योगिक उत्पादन वाढवणे आणि शिक्षित तरुणांमधील बेरोजगारी कमी करण्यासाठी त्यांना उपयुक्त औद्योगिक रोजगारासाठी सुसज्ज करणे आदी आयआटीआय प्रशिक्षण संस्थेची उद्दिष्ट्ये आहेत.
तंत्रशिक्षण व तंत्रशिक्षणाशी संबंधित विविध शाखा एका छत्राखाली आणण्यासाठी सन 1948 मध्ये तंत्र शिक्षण विभागाची स्थापना करण्यात आली. अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रज्ञान संस्था, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक शाळा, तांत्रिक शाळा, सरकारी औद्योगिक प्रशिक्षण कार्यशाळा व्यावसाय आणि तांत्रिक प्रशिक्षण संबंधित इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यांच्याशी संबंधित विविध बाबी, प्रशासन आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी या विभागावर सोपवण्यात आली होती.