(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना शेवटाची सुरुवात? मुंबईतील दैनंदिन रुग्णांचा आकडा शंभरीच्या आत, तर राज्यातील आकडा 1000च्या आत
Maharashtra Coronavirus Update : कोरोना शेवटाची सुरुवात? मुंबईतील दैनंदिन रुग्णांचा आकडा शंभरीच्या आत, तर राज्यातील आकडा 1000च्या आत
Maharashtra Coronavirus Update : सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशासह राज्यावरही कोरोनाचं सावट आहे. अशातच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमयाक्रॉननं सर्वांची धाकधूक वाढवली होती. तसेच, त्यापूर्वी कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनं धुमाकूळ घातला होता. तेव्हापासून देशासह राज्यात निर्बंध लादण्यात आले होते. अशातच कोरोना असाच नियंत्रणात राहिल्यास मार्चनंतर 100 टक्के अनलॉकचा निर्णय घेता येईल, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
संपूर्ण देशासह राज्यात कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाच्या 806 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात गेल्या 24 तासांत 2 हजार 696 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल (सोमवारी) राज्यातील नऊ महानगरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही तर 32 महानगपालिकांमध्ये कोरोनाबाधितांच्या एकेरी संख्येची नोंद झाली आहे. तर 58 महानरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही कोरोना प्रादुर्भाव (Mumbai Corona Update) आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या शंभरच्या आत आली आहे. काल दिवसभरात मुंबईत 96 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 188 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्यानं आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 415 इतकी झाली आहे. आज नव्यानं सापडलेल्या 96 रुग्णांपैकी 17 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं पालिकेकडील 36 हजार 308 बेड्सपैकी केवळ 807 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.
राज्यात काल 53 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात काल 53 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 4509 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 3994 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 515 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha