कोरोनाबाबत सरकारकडून नवीन गाईडलाईन्स; राज्यातील लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवला
राज्यात टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार राज्यातील लॉकडाऊन आता 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे.
मुंबई: कोरोनाला संपूर्णत: आळा घालण्यासाठी राज्यातील लॉकडाऊनमध्ये 28 फेब्रुवापरीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे आदेश राज्य सरकारच्या वतीनं शुक्रवारी प्रशासनाच्या सर्व विभागांना देण्यात आले आहेत. या दरम्यान आधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी सुरु राहतील असेही स्पष्ट करण्यात आलं आहे तर कंटेन्मेंट क्षेत्रातील लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.
राज्यातील लॉकडाऊनला सातत्याने मुदतवाढ देण्यात येत असून शुक्रवारीही तशाच प्रकारची मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आली होती त्या तशाच सुरु राहतील तर परवानगी देण्यात न आलेल्या गोष्टी या बंद राहतील. या संबंधी राज्य सरकारने वेळोवेळी जारी केलेले आदेश बंधनकारक राहतील असंही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
राज्यात या आधी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबर रोजी 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत काही नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली होती. त्यावेळी ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आली होती त्या आताही सुरु राहणार आहेत. पण कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊनचे नियम कायम ठेवण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोनाच्या आकडेवारी संबंधी माहिती देताना सांगितलं होतं की महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांत कोरोनाचे 67 टक्के अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या दोन राज्यात मिळून 40 हजाराहून जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली होती. महाराष्ट्र राज्यात गुरुवारी 2,889 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले होते.
राज्य सरकारच्या या नव्या नियमावलीनुसार राज्यातील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती संख्या 30 टक्के कायम ठेवण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरातील दुकानं आणि आस्थापनांना रात्री 11 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तसेच मुंबई आणि परिसरातील उपहारगृहं ही रात्री एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.