(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारपार, 5218 रुग्णांची नोंद
Maharashtra Corona Update : राज्यात आज 5218 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 4989 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज 5218 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 4989 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 2479 रुग्णांची भर पडली आहे.
एका कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,77,480 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.83 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 24,867 सक्रिय रुग्ण
राज्यात आज एकूण 24,867 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 13614 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 5488 सक्रिय रुग्ण आहेत
देशात सक्रिय रुग्णांचा आकडा 83 हजारांच्या पुढे
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,313 नवीन रुग्ण आढळले आहेत, 10,972 लोक या आजारातून बरे झाले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 83 हजारांहून अधिक (83,990 रूग्ण) वाढली आहे. यापूर्वी 22 जून रोजी देशभरात कोरोना संसर्गाची 12249 नवीन रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने झालेली वाढ पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना लगाम घालण्यावर चर्चा झाली आहे.