Maharashtra Corona Update : चिंता वाढली! राज्यात मंगळवारी 711 रुग्णांची नोंद तर 366 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. सध्या राज्यात 3475 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचे (Maharashtra Corona Update) सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मास्कची देखील सक्ती नाही.कोरोना संपलाय, अशी आशा बाळगत असाल तर आज राज्याची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मंगळवारी राज्यात 711 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 366 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात 3475 सक्रिय रुग्णांची नोंद
राज्यात आज एकूण 3475 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 2526 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल ठाण्यामध्ये 413 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यूची नोंद
राज्यात आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,35, 751 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.08 टक्के इतके झाले आहे.
भारतातील कोरोना विषाणू संसर्गाचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 338 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी 2706 कोरोना रुग्णांची नोंद आणि 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जारी करत ही माहिती दिली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच सोमवारी दिवसभरात 2 हजार134 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून देशात आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 15 हजार 574 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 19 कोरोना रुग्णांनी प्राण गमावला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 24 हजार 630 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.