(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात बी ए. 4 बी ए. 5 व्हेरीयंटचे 23 रुग्ण तर 1728 नव्या रुग्णांची नोंद
Maharashtra Corona Update : राज्यात आज 1728 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 2708 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज 1728 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2708 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 840 रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात बी ए.5 आणि बी ए. 4 व्हेरीयंटचे आणखी 23 रुग्ण
राज्यात पहिल्यांदाच बीए5 व्हेरीयंट 17 आणि बीए 4 व्हेरीयंटचे सात रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये 11 पुरूष आणि 12 स्त्रिया आहेत. राज्यात आतापर्यंत आढळलेलल्या बी ए 5 आणि बी ए. 4 रुग्णांची संख्या 49 झाली आहे. यातील 15 पुण्यातील, मुंबईतील 28, नागपूरमधील चार आणि ठाण्यातील दोन रुग्ण आहेत
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज चार कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,83,940 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.84 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 24,333 सक्रिय रुग्ण
राज्यात आज एकूण 24, 333 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 12043 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 5836 सक्रिय रुग्ण आहेत
देशात 15 हजार 940 नवीन कोरोनाबाधित
देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 940 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन कोरोनाबाधितांच्या आकडा जरी किंचित घटला असला तरीही देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या देशामध्ये कोरोनाचे 91 हजार 779 सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी झालेल्या नवीन 20 मृत्यूंमुळे देशातील कोरोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 24 हजार 974 वर पोहोचला आहे. तर गेल्या 24 तासांत 12 हजार 425 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे.