भिवंडीत अत्याधुनिक सुविधायुक्त जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
भिवंडी आणि आजूबाजूच्या परिसराची गरज लक्षात घेता या ठिकाणी 818 बेडचे अत्याधुनिक कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे.
भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले असल्याने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी भिवंडीतील सवाद येथे 818 बेडच्या भव्य अशा अत्याधुनिक सुविधायुक्त जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खासदार कपिल पाटील, जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी रुग्णालय उभारणीसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या रुग्णालयासाठी भिवंडी कल्याण रस्त्यावरील सवाद ग्रामपंचायत क्षेत्रातील 2 लाख 30 हजार चौरस फुटाच्या गोदाम बांधकाम याची निवड केल्याने या रुग्णालयाचा फायदा भिवंडी शहापूरसह कल्याण, मुरबाड या तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या बरोबरच शहरी भागातील रुग्णांना सुध्दा होणार आहे .या जिल्हा कोविड रुग्णालयाच्या उदघाटनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी एल अँड टी कंपनीने सीएसआर फंडातून रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेसाठी दिलेल्या रोबोटचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे हा रोबोट मोबाईलद्वारे चालविण्यात येत होते. त्यामुळे कार्यक्रमाप्रसंगी हा रोबोट आकर्षणाचा विषय ठरले होते.
सवाद येथील जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालय एकूण 2 लाख 30 हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत बनविण्यात आलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयात 360 महिला 379 पुरुष यांसाठी बेड सुविधा असून सर्व बेडजवळ ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असणार आहे. तर 88 अतिदक्षता बेड, त्यामधील 20 व्हेंटिलेटर , 20 बायपॅक व 40 हायफ्लोनॅशल कॅनॉल सुविधा असलेले असे एकूण 818 बेड आहेत. हे सर्व बेड ऑक्सिजनयुक्त बेड आहेत. .या रुग्णालयात वापरण्यात आलेले सर्व साहित्य हे आग विरोधक असून हे पुनः वापरात येणारे आहे. विशेष म्हणजे या रुग्णालायत रुग्णांसाठी योगाभ्यास, करमणुकीसाठी कॅरम ,दूरदर्शन या सुविधांसह रुग्णांना कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी दहा टॅब ठेवून त्याद्वारे व्हिडीओ कॉल करून कुटुंबियांशी संवाद साधत आपल्या उपचारा सोबतच अडचणी बाबत माहिती देता येणार आहे .
या रुग्णालय परिसरात तब्बल 75 सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्याचे नियंत्रण करण्यासाठी कंट्रोल रूम बनविण्यात आली आहे . येथील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडू नये या साठी तब्बल तीन ऑक्सिजन टॅंक या ठिकाणी लावण्यात आला आहेत. या रुग्णालयातील शौचालय सुध्दा ऑक्सिजन युक्त केले आहेत. या रुग्णालयाची विशेषतः म्हणजे येथील रुग्णांसोबत काम करणाऱ्या डॉक्टर नर्स यांचा थेट संपर्क येणार नाही यासाठी वेगळा "नर्स वे" बनविण्यात आला असून त्या ठिकाणी पीपीई किट्स न घालता वेगळ्या वातावरणात त्यांना राहता येणार असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :