(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात आज 678 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 35 रुग्णांचा मृत्यू
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 35 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 678 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 83 हजार 435 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे.
राज्यात आज 35 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7555 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 83 हजार 421 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 963 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 55 , 11, 394 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 78 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुण्यात गेल्या 24 तासात 78 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 84 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496772 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 824 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 3869 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या घटतेय
भारतात कोरोनाच्या संसर्गाचा जोर कमी होत असल्याची परिस्थिती आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. नवीन कोरोनाबाधित आणि बाधितांच्या मृत्यू संख्येतही घट होत आहे. मागील 24 तासांत 6990 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 190 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांमध्ये 10 हजार 116 बाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. देशभरात सध्या एक लाख 543 कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भारतात आतापर्यंत 1 अब्ज 23 कोटी, 25 लाख, 2 हजार 767 कोविड लशीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत तीन कोटी 40 लाख 18 हजार 299 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले. तर, चार लाख 68 हजार 980 लोकांचा कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला आहे. कोविड चाचणीवरही भर देण्यात येत आहे. मागील 24 तासांमध्ये 10 लाख 12 हजार 523 जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.