Maharashtra Corona Update : सातारा, पुणे, अहमदनगर आणि मुंबईत अजूनही दैनदिन रुग्णसंख्या तीनअंकी! काय सांगतेय आकडेवारी?
Maharashtra Corona Update : राज्यात आज 2 हजार 294 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 823 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. राज्यात आता केवळ सातारा (110), पुणे (259), अहमदनगर (399) आणि मुंबई (445) विभागात तीन अंकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात आज एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही.
राज्यात आज 2 हजार 294 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 823 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 01 हजार 287 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. दरम्यान, राज्यात आज 28 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 33 हजार 449 सक्रीय रुग्ण आहेत.
मुंबईत आज 453 नवीन रुग्णांची नोंद
मुंबईत मागील 24 तासांत 453नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 457 रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. परिणामी बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 7 लाख 24 हजार 063 इतकी झाली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा दर 97% झालाय. सध्या शहरात 5 हजार 28 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. दुप्पटीचा दर आता 1057 दिवसांवर गेला आहे.
देशात 19 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद
भारतात कोरोना संसर्गात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवरीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 18,166 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 214 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. अशातच 24 तासांत 23624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच, सक्रिय रुग्णसंख्येत 5672 नी कमी झाली आहे.
देशातील कोरोना स्थिती :
कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 39 लाख 53 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 50 हजार 589 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाबा म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 32 लाख 71 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख आहे. एकूण 2 लाख 30 हजार 971 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.