Maharashtra Corona Cases Daily Update | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच, आज 56 हजार 286 रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 8 हजार 938 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4503 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 3 लाख 92 हजार 514 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात आज दिवसभरात 56 हजार 286 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 376 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 36 हजार 130 जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताच आहे. शहरात आज 8 हजार 938 रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 22 लाख 82 हजार 191 वर पोहोचली आहे. तर सध्या 5 लाख 21 हजार 317 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 26 लाख 49 हजार 757 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. रुग्ण बरं होण्याचा दर 82.05 टक्के आहे. राज्यातील मृतांचा आकडा 57 हजार 028 वर पोहोचला आहे. मृत्यूदर 1.77 टक्के आहे.
सध्या 27 लाख 2 हजार 613 जण होम क्वॉरन्टीन असून 22 हजार 661 जण इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टीन आहेत. आतापर्यंत राज्यात 26 लाख 49 हजार 757 कोरोनाबाधित रुग्ण होऊन घरी गेले आहे. आज 36, 130 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
मुंबईत 8 हजार 938 रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 8 हजार 938 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4503 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 3 लाख 92 हजार 514 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के झाला आहे. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 86 हजार 297 आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 33 दिवस झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा. 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.
राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत आहे. ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करीत आहे. नियमावली जाहीर केली आहे.